Tue, Jan 19, 2021 16:14होमपेज › Kolhapur › 27 कोरोनाग्रस्त आणखी वाढले

27 कोरोनाग्रस्त आणखी वाढले

Last Updated: May 24 2020 1:14AM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढच होत आहे. शनिवारी दिवसभरात आणखी 27 रुग्णांची त्यात भर पडली. यामुळे जिल्ह्याचा आकडा 286 वर गेला. गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथील अवघ्या दोन महिन्यांच्या बालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा रुग्ण हे बालक ठरले आहे.

जिल्ह्यात 13 मेपर्यंत अवघे 21 रुग्ण होते. त्यापैकी 13 जण बरे होऊन घरीही परतलेले होते. जिल्ह्यात बाहेरून आलेल्या लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागल्याने गेल्या केवळ दहा दिवसांत जिल्ह्यात 260 रुग्ण वाढले. सरासरी 28 असा दैनंदिन रुग्णवाढीचा वेग राहिला आहे. आजही आणखी 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शनिवारी सकाळी दोन रुग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल आले. यानंतर दुपारी 9, सायंकाळी 8 आणि रात्री उशिरा 8 जणांचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्‍त झाले. दिवसभरातील सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्‍त झालेल्या अहवालांपैकी सर्वाधिक 7 अहवाल भुदरगड तालुक्यातील आहेत.

वेंगरूळमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. राणेवाडीत एकाच कुटुंबातील दोघेजण बाधित आहेत. आदमापूरमध्येही एकजण कोरोनाबाधित आढळून आला आहे. बारवे, टिक्केवाडी येथे प्रत्येकी एक तसेच पाटगावमध्ये आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. यामुळे भुदरगडमधील बाधितांचा आकडा 31 वर गेला.

शाहूवाडीतील बाधितांचा आकडा शंभरीकडे चालला आहे. शुक्रवारी तालुक्यातील रुग्णसंख्या 82 होती. त्यात आज आणखी 5 जणांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील एकट्या शाहूवाडी तालुक्यात आजअखेर सर्वाधिक 87 रुग्ण झाले आहेत. आजरा तालुक्यात शृंगारवाडी येथे एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. आज आढळलेल्या या दोन रुग्णांसह आजरा तालुक्यातील रुग्णसंख्या 15 पर्यंत गेली आहे.

चंदगड तालुक्यातही कोवाड येथे आणखी एक रुग्ण आढळला. त्यामुळे चंदगडची आजअखेरची एकूण रुग्णसंख्याही 18 वर गेली. पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे येथे आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. यापूर्वी लागण झालेल्या एका मुलाच्या वडिलांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे पन्हाळा तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 15 वर गेली. गगनबावडा तालुक्यात अवघ्या 2 महिन्यांच्या बालकाला कोरोना झाला आहे. 25 वर्षीय महिला मुंबईहून पती, दोन महिन्यांचे बालक आणि कुटुंबातील अन्य नातेवाईकांसह अणदूर या आपल्या गावी आली होती. या सर्वांचे सीपीआरमध्ये स्वॅब घेण्यात आले होते.

महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला सीपीआरमध्येच ठेवण्यात आले. तिच्यासोबत तिचे दोन महिन्यांचे बाळ असल्याने त्यालाही कोरोना झाला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, या दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे सीपीआरमधील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची रुग्णसंख्या आजरा - 15, भुदरगड - 31, चंदगड - 18, गडहिंग्लज - 13, गगनबावडा - 5, हातकणंगले - 3, कागल - 1, करवीर - 10, पन्हाळा - 15, राधानगरी - 42, शाहूवाडी - 87, शिरोळ - 5, नगरपालिका क्षेत्र - 10 (इचलकरंजी न.पा. - 6, जयसिंगपूर - 3, कुरुंदवाड - 1), महापालिका क्षेत्र (कोल्हापूर शहर) - 16, अन्य राज्य, जिल्ह्यातील  - 4.
गगनबावड्यात दोन महिन्यांच्या बालकाला कोरोना