कोल्हापूर जिल्ह्यात दिवसात उच्चांकी 21 मृत्यू

Last Updated: Aug 10 2020 1:15AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत 21 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही आजपर्यंतची जिल्ह्यातील कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडल्याची एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसह प्रशासनासाठीही आजचा रविवार चिंताजनक ठरला. जिल्ह्यातील मृत्यूंची एकूण संख्या आता 290 इतकी झाली आहे. शनिवारी सायंकाळी सहा ते रविवारी सायंकाळी सहा या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडे नोंद झालेल्या या मृत्यूंत सर्वाधिक दहाजण इचलकरंजी शहरातील आहेत. आज दिवसभरात 448 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण बाधितांची संख्या 10 हजार 439 वर गेली आहे.

दिवसभरात 216 जणांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्‍त झालेल्यांची संख्या 4 हजार 337 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आज कोरोनाबाधित 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली. इचलकरंजी शहरातील 46 वर्षांच्या पुरुषाचा कोल्हापुरातील आयसोलेशन हॉस्पिटल येथे, लालनगर येथील 75 वर्षांचा, वेताळ पेठ येथील 54 वर्षांचा, बणगर मळा येथील 62 वर्षांचा, धनगर मळा येथील 60 वर्षे अशा पाच पुरुषांचा, तर स्वामी मळा येथील 65 वर्षांची, टाकवडे वेस येथील 65 वर्षांची, शहापूर रोडवरील 70 वर्षांची, लालनगर येथील 59 वर्षांची, तर शहापूर येथील 60 वर्षे असा पाच महिलांचा इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील तिघांचा आज मृत्यू झाला. कृष्णानगर येथील 57 वर्षांच्या महिलेचा खासगी रुग्णालयात, तर सानेगुरुजी वसाहत येथील 72 वर्षांच्या पुरुषाचा, रमण मळा येथील 59 वर्षांच्या पुरुषाचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

आजरा येथील 68 वर्षांच्या महिलेचा कोल्हापुरातील आयसोलेशन रुग्णालयात आज मृत्यू झाला. महागाव (ता. गडहिंग्लज) येथील 73 वर्षांच्या पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यड्राव (ता. शिरोळ) येथील दोन महिलांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. 70 वर्षांच्या महिलेचा संजय घोडावत विद्यापीठ येथे, तर 55 वर्षांच्या महिलेचा इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. हुपरीतील 55 वर्षांच्या महिलेचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. साजणी (ता. हातकणंगले) येथील 55 वर्षांच्या महिलेचा इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. तामगाव (ता. करवीर) येथील 56 वर्षांच्या पुरुषाचा तसेच निळपण (ता. भुदरगड) येथील 60 वर्षार्ंच्या महिलेचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

जिल्ह्यात दिवसभरात 448 नव्या बाधितांची भर पडली. कोल्हापूर शहरात 69 नव्याने रुग्ण आढळून आले. वारे वसाहतीत आज आणखी पाच रुग्णांची भर पडली. देवकर पाणंद, राजलक्ष्मीनगरात सासू, सून आणि नात असे एकाच कुटुंबातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मातंग वसाहतीसह राजारामपुरी परिसरात सहा नव्या रुग्णांची वाढ झाली. सिद्धार्थनगरात नव्याने आणखी तीन रुग्ण आढळले. उभा मारुती चौक, काळकाई गल्‍ली आदी परिसरात शिवाजी पेठेत तीन रुग्ण वाढले. जुना बुधवार पेठेत डांगे गल्‍ली, शुक्रवार पेठेत कडरे गल्‍ली आदीसह कसबा बावडा, कदमवाडी, विक्रमनगर, शाहूपुरी चौथी गल्‍ली, ई. पी. हायस्कूल कंपाऊंड, मंगळवार पेठ, बाजार गेट आदी परिसरात रुग्ण आढळले.

हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी शहरात 93 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कुंभोजमध्ये नऊजण बाधित आढळून आले आहेत. रूई आणि पट्टणकोडोलीत प्रत्येकी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. कबनूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांसह पाचजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अतिग्रेत एकाच कुटुंबातील पाचजण बाधित आढळून आले आहेत. हेर्लेत एकाच कुटुंबातील तिघांना, तर मौजे वडगाव येथे तिघांना लागण झाली आहे. चंदूरमध्ये दोन रुग्ण वाढले आहेत. पेठवडगाव, अंबप, रेंदाळ, माणगाव, कोरोची, यळगूड आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले.

करवीर तालुक्यात गांधीनगर, वडणगे, कावणे, आमशी, पाचगाव, कळंबा, मोरेवाडी आदी परिसरात रुग्ण आढळले. साबळेवाडी येथे एकाच कुटुंबातील 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राधानगरी तालुक्यात कसबा तारळेत एकाच कुटुंबातील आणखी चौघांना लागण झाली आहे. सुळंबीतही एकजण बाधित आढळून आला आहे. कागल तालुक्यात हळदी व बाचणी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. शिरोळ तालुक्यातही पाचजणांचे, तर पन्हाळा तालुक्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

दिवसभरात 216 जण कोरोनामुक्‍त

जिल्ह्यात आज दिवसभरात 216 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या 4 हजार 337 इतकी झाली आहे. जिल्ह्यात सीपीआरसह विविध कोरोना रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, खासगी रुग्णालये, हॉटेल आणि घरी असे सुमारे 5 हजार 820 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आरटी-पीसीआर आणि सीबी-नॅट मशिनद्वारे तपासलेल्या 862 अहवालांपैकी 651 अहवाल निगेटव्हि आले आहेत. 124 पॉझिटिव्ह अहवाल असून, 79 प्रलंबित आहेत. आठ नमुने रिजेक्ट करण्यात आले आहेत. अँटिजेन टेस्टचे 747 अहवाल प्राप्‍त झाले. त्यापैकी 551 अहवाल निगेटिव्ह आले. त्यापैकी 6 स्वॅब आरटी-पीसीआर मशिनद्वारे तपासणीसाठी पुन्हा पाठवण्यात आले. अँटिजेन टेस्टमध्ये 196 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर दिवसभरात खासगी प्रयोगशाळांतील प्राप्‍त अहवालांपैकी 128 जण बाधित आढळून आले आहेत.

अबब! महिन्यात नऊ  हजार रुग्ण!!

जिल्ह्यात केवळ महिन्याभराच्या कालावधीत तब्बल नऊ हजारांहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. दि. 7 जुलै रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक हजार झाली होती. एक हजार रुग्णांसाठी 104 दिवसांचा कालावधी लागला होता. मात्र, त्यानंतर दि. 8 ऑगस्ट रोजी म्हणजे सुमारे 32 दिवसांत नऊ हजार रुग्ण वाढले. यामुळे जिल्ह्याने बाधितांचा दहा हजारांचा टप्पा ओलांडला.

रिकव्हरी रेटही झाला कमी

जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) कमी झाला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी जिल्हा राज्यात अग्रभागी होता. रिकव्हरीचे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत गेले होते. मात्र, रुग्णसंख्या वाढल्याने हे प्रमाण रविवारी 41.54 टक्के इतके होते.

मृत्यू दरही वाढला

जिल्ह्यात मृत्यू दरही वाढला आहे. दररोज वाढत जाणार्‍या रुग्णसंख्येबरोबर मृत्यूंचेही प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात महिनाभरापूर्वी 1.54 टक्के इतका मृत्यू दर होता. आज तो 2.77 टक्के इतका झाला आहे.