Thu, Sep 24, 2020 06:35होमपेज › Kolhapur › मुरगूडच्या 16 नगरसेवकांचे राजीनामे

मुरगूडच्या 16 नगरसेवकांचे राजीनामे

Published On: Apr 30 2019 2:11AM | Last Updated: Apr 30 2019 2:09AM
मुदाळतिट्टा : प्रतिनिधी

मुरगूड शहरास गेले अनेक दिवस दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठाप्रश्‍नी जनतेकडून नगरपालिका प्रशासनाला जागे करण्याचे काम करण्यात आले होते;  पण याकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी नगरपालिकेत पाणीप्रश्‍नी आणीबाणीच झाली. सत्तारूढ शिवसेना (मंडलिक गट) तसेच विरोधी पक्षनेत्यानेही आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. हे राजीनामे प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठवण्यात आले. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

मुरगूड शहराला सर पिराजीराव तलावामधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या फिल्टर हाऊसमधील ब्लोरिंग मशिन गेली दीड ते दोन वर्षे बंद असल्याने शहरास दूषित पाणीपुरवठा होत आहे. याचा उद्रेक दि. 29 रोजी सकाळी दहाच्या सुमारास झाला. सत्तारूढ नगरसेवकांसह विरोधी नगरसेवक आणि नागरिक नगरपालिका कार्यालयासमोर मोर्चा काढून जमा झाले व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली.  

यावेळी संतप्त नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना त्यांच्या दालनातून बाहेर काढून त्यांच्या तसेच उपनगराध्यक्ष मेंडके यांच्याही दालनास कुलूप लावण्यात आले. यावेळी नगरपालिकेच्या मुख्य दरवाजाजवळ थांबून नागरिक व नगरसेवकांनी तीव्र घोषणाबाजी केली. शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना या दूषित पाणी प्रश्‍नावर चांगलेच धारेवर धरले.

सध्या मुरगूड नगरपालिकेवर मंडलिक गटाची सत्ता आहे. येथे नगराध्यक्षांसह 16 नगरसेवक, नगरसेविका मंडलिक गटाच्या आहेत. तर उर्वरित तीनपैकी दोन नगरसेवक आ. हसन मुश्रीफ गटाचे व पाटील गटाचा एक नगरसेवक आहे. नगराध्यक्ष राजेखान जमादार हे लोकनियुक्‍त नगराध्यक्ष आहेत.

प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रकामध्ये मंडलिक गटाच्या उपनगराध्यक्ष नामदेव मेंडके, नगरसेविका श्रीमती प्रतिभा पांडुरंग सूर्यवंशी, सुप्रिया राजेंद्र भाट, हेमलता भगवान लोकरे, रेखा आनंदा मांगले, वर्षाराणी सचिन मेंडके, अनुराधा अनिल राऊत, रंजना दत्तात्रय मंडलिक, नगरसेवक दीपक तुकाराम शिंदे, मारुती दिनकर कांबळे, एस. व्ही. चौगले, संदीप बाबुराव कलकुटकी व पक्षप्रतोद जयसिंग साताप्पा भोसले, धनाजीराव गोधडे यांच्या सह्या आहेत. 

पाणीपुरवठा समिती सभापती रवीराज परीट हे मुश्रीफ गटाचे आहेत. त्यांनीदेखील राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर राहुल पांडुरंग वंडकर हे पाटील गटाचे आहेत, ते पालिकेचे विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहत आहेत. त्यांनीदेखील राजीनामा दिला आहे. एकूण पाणी प्रश्‍नावरून 16 नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने गोंधळ उडाला आहे.