Tue, Jul 14, 2020 13:17होमपेज › Kolhapur › 'शेतीच्या पाण्याला धक्का न लागता इचकरंजीला पाणी देणार' 

'शेतीच्या पाण्याला धक्का न लागता इचकरंजीला पाणी देणार' 

Last Updated: Jun 30 2020 9:13PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा पाटबंधारे विभागाच्या प्राप्त अहवालानूसार इचलकरंजी शहरासाठी काळम्मावाडी धरणातून आरक्षीत एक टीएमसी पाणी मिळू शकते. तरीही अर्धा टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. ही योजना कार्यान्वित होताना शेती सिंचनाच्या पाण्याला कोणताही धक्का लागणार नाही. त्यामुळे इचलकरंजी पाणी योजना यशस्वीतेसाठी गट, तट व पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केले. शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे पार पडलेल्या इचलकरंजी पाणी योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. 

इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावरून राजकीय प्रत्यारोप जोर धरत आहेत. पंचगंगा नदीच्या प्रदूषीत पाण्यामूळे इचलकरंजी नागरिकांची अवस्था तळ्यात मळ्यात झाली आहे. यासाठी खासदार माने यांनी शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पाटबंधाऱ्याचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर यांनी नियोजित योजनेतून इचलकरंजी शहरास पाणी देण्यास कोणतीही अडचण नसल्याची माहिती उपस्थितांना दिली. 

सदर पाणी योजना ही इचलकरंजी शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तेव्हा ३१ जुलैपूर्वी जीवन प्राधिकरणाने अहवाल सादर करावा. यावेळी कागल, शिरोळच्या शेती सिंचनासाठी असलेल्या आरक्षित पाण्याला धक्का न लावता पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी इचलकरंजी शहरासाठी देण्यात यावे असे धैर्यशील माने यांनी सांगीतले.

यावेळी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक उदयसिंह पाटील, मदन कारंडे, रविंद्र माने, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, माजी नगरसेवक महादेव गौड, माजी शिक्षण सभापती नितीन कोकणे, अशोक स्वामी आदी प्रमुख उपस्थित होते.

इचलकरंजी शहराला सुळकुड येथून पाणी देण्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी विरोध केला आहे. पण त्यांना योग्य माहिती देवून त्यांचा गैरसमज दूर करू. 
नगराध्यक्षा ऍड अलका स्वामी