‘पुढारी रिलिफ फाऊंडेशन’तर्फे कोल्हापूर महापालिकेस दोन यांत्रिकी बोटी प्रदान (video)

Last Updated: Aug 09 2020 1:11AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शहरात पूरस्थिती उद्भल्यास पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी ‘पुढारी रिलिफ फाऊंडेशन’तर्फे महापालिकेला दोन यांत्रिकी बोटी प्रदान करण्यात आल्या. यापूर्वी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला पाच यांत्रिकी बोटी प्रदान केल्या आहेत.

महापालिकेतील विठ्ठल रामजी शिंदे चौकात हा कार्यक्रम झाला. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी यांनी ‘पुढारी’ परिवाराचे आभार मानले. दरम्यान, सांगली महापालिकेला दोन आणि कराड नगरपालिकेला एक बोट प्रदान केली जाणार आहे.

‘पुढारी रिलिफ फाऊंडेशन’तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्या हस्ते महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे बोटींसह जीवरक्षक साहित्य सुपूर्द करण्यात आले. यामध्ये दोन रबर बोटी, ओबीएम मशिन, 20 बीओ रिंग, लाईफ जॅकेट लहान मुलांचे दहा आणि मोठ्यांसाठी 20 इतके साहित्य महापालिकेकडे सुपूर्द केले. या साहित्याची देखभाल-दुरुस्ती महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे राहणार आहे.

यावेळी महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या, संभाव्य पूरस्थितीत शहरातील बचावकार्यासाठी बोटी आवश्यक होत्या. ती गरज दै. ‘पुढारी’ने पूर्ण केली. याबद्दल ‘पुढारी’ परिवाराचे महापालिकेतर्फे आभार मानत आहे. आयुक्‍त डॉ. कलशेट्टी  म्हणाले, जिल्हा प्रशासनासह महापालिकेकडेही बचावकार्यासाठी बोटी असणे आवश्यक होते. ‘पुढारी’च्या माध्यमातून हे साहित्य उपलब्ध झाले असून, बचावकार्यासाठी महापालिका आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. महापालिकेने केलेल्या विनंतीवरून या बोटी उपलब्ध केल्याबद्दल ‘पुढारी’ परिवाराचे आभारी आहोत.

या कार्यक्रमास उपमहापौर संजय मोहिते, स्थायी सभापती संदीप कवाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम, शिवसेना गटनेता राहुल चव्हाण, प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, उपायुक्‍त निखिल मोरे,  मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले यांच्यासह महापालिका अधिकारी-कर्मचारी, अग्‍निशमन विभागाचे जवान, बचाव पथकातील स्वयंसेवक उपस्थित होते.