होमपेज › Kasturi › नव्याच्या संगतीला जुनंही हवं !

नव्याच्या संगतीला जुनंही हवं !

Published On: Sep 12 2019 1:58AM | Last Updated: Sep 11 2019 7:50PM
सुचित्रा सरपोतदार

“आजी, चल ना, आज ‘पुष्प’मध्ये जाऊन न्यू फॅशनचा मस्त ड्रेस आणूया. तुझी कुामं संपतच नाहीत बघ. आज काय भाजाणी काढायचीत, घर झाडायचं, हज्जार कामं आहेत असं सांगतेस. आई करेल गं.’ समीराचं लाडे-लाडे बोलणं ऐकताच आजी म्हणाली, ‘समीरा, मला काय फ्रॉक, जरीकाठाचा परकर-ब्लाऊज,फार तर चुडीदार एवढंच माहीत आहे बाई, तू आपली आई-बाबांना घेऊन जा. समू, मी फक्‍त बरोबर येईन हं.’

घरोघरी असे नव्या-जुन्या पिढीतील संवाद कानी पडतात. आजचा जमाना फॅशनचा जमाना आहे. कपडे, ड्रेस मटेरियल याबाबत तर काय न बोललेलच बरं. ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ या उक्‍तीप्रमाणे जग धावतंय. रोज एक फॅशन कपड्यांच्या मार्केटमध्ये येतेय. टीव्ही सिरिअल्स, पिक्‍चरमधली डे्रपरी युवक-युवतींच्या मनाला भुरळ पाडतेय. जुनं तेच नव रूप घेऊन फेव्हरेट बनतंय. छोट्या-छेाट्या मुलींचे ड्रेस, स्टाईल पाहिली की आपण फारच मागास आहे असं वाटतंय. आज पश्‍चिमात्य जगातील फॅशन्स, ड्रेसेस कधी आपल्या पानावर पगडा बसवितात आपल्याला कळतचं नाही. आज टीव्ही, कॉम्पुटरमुळं जग जवळ येत चाललंय. नको इतका ‘भोगवादाचा पगडा युवा पिढीवर, नव्हे तर सर्व वयोगटांतील लोकांवर पडत आहे.’

बेबी गटातील ड्रेसची नावं तर लक्षात ठेवणसुद्धा जरा कठीणच आहे. लेगीज काय, चुडीदार, चनियाचोली, शरारा, स्कर्ट-टॉप एकपेक्षा एक. पण छोट्यांच्या तोंडात ही नावं चटकन बसतात कारण हल्‍लीची पिढी कॉम्प्युटर युगातली आहे. एकदम बुद्धिमान! चटपटीत अन् हुश्शार! शिवाय जिन्स, थ्रीफोर्थ, मसककली, अनारकली, बाबासूट, जिन्स, टी-शर्ट सारख्या व्हरायटी लहानमोठ्यांना भुरळ पाडतात.

पण एक गोष्ट खरीय की, टॉप पर्सनॅलिटीसाठी कपड्यांमध्ये वैविध्य हवेच. इंटरव्ह्यू असो अथवा बर्थ-डे पार्टी अथवा मॅरेज पार्टी. आपलं व्यक्‍तिमत्त्व एकदम स्मार्ट लुकिंग, दिलखेचक असायला हवे, ही गोष्ट सर्वमान्य. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच. छोट्या व युवतींच्या वयाला, सभ्यतेला साजेलसेच कपडे हवेतही! आज समाजात नाही म्हटलं तरी सुरक्षितता थोडी कमीच आहे. अत्याचार, बलात्काराच्या घटना मनाला सुन्‍न करीत आहेत. अशा सामाजिक वातावरणात फॅशनच्या तर्‍हा असाव्यात पण भावनेला उत्तेजित करणारे, अस्वस्थ करणारे डे्रस नसावेत.

वस्त्रांचा रंग, डिझाईन, टाईप स्वतःच्या वयाला व शरीराला शोभेल असा असावा. जातिवंत सौंदर्य काणत्याही ड्रेसमध्ये खुलून दिसते, हे विसरता कामा नये. पारंपरिक साडी, परकर ब्लाऊजला पण रामराम ठोकायला नको, कारण कधीतरी धोतर-शर्ट, विजारकडे पाहून हे काय?  असा प्रश्‍न युवापिढीनं विचारू नये. नव्याबरोबर जुनंही संगतीला हवं हे नक्‍की.