Mon, Jun 01, 2020 20:46
    ब्रेकिंग    



होमपेज › Kasturi › कलाईडोस्कोप :  दुख : एकटेपणाचे

कलाईडोस्कोप :  दुख : एकटेपणाचे

Last Updated: Mar 18 2020 8:03PM




डॉ. ऊर्जिता कुलकर्णी
होमिओपॅथिक तज्ज्ञ (मानसोपचार, लैंगिक समस्या)

वयाच्या वाढत्या टप्प्यावर काही धारणा कशा तयार होऊन रुजतात, त्याची ही काही उदाहरणे.
३० वर्षांच्या एका अविवाहित स्त्रीला सतत नैराश्य असते. विमनस्क अवस्थेत जगताना तिला सततचा एकटेपणा छळतो. यावर जोडीदार शोधणे हे मात्र तिला नकोसे वाटते. याबाबत तिचा समज म्हणजे, लग्नं ही न टिकणारी असतात. शिवाय त्यातून येणारं नैराश्य हे तुलनेने अधिक त्रासदायक असतं. त्यापेक्षा त्या वाटेलाच न गेलेलं बरं. याचं कारण ती 13 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी घेतलेली फारकत.

४५ वर्षांचे एक गृहस्थ सतत असमाधानी असतात. त्यांच्या लेखी, त्यांना समजून घेणारी व्यक्ती त्यांच्या कुटुंबात किंवा मित्रांमध्ये अजिबातच नाही. त्यांना जाणवणारा एकटेपणा त्यांच्या लेखी कधीही संपणाराच नाही! त्यांच्या या मानसिकतेचं कारण त्यांच्या पौगंडावस्थेत सापडलं. या वयात घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणासाठी घरापासून दूर, नातेवाईकांकडे रहायला लागलं. त्यात सतत आपण यांच्यापैकी नाही, ही भावना रुजत गेली. त्याला त्यांच्या सतत अभ्यास करण्याच्या नावाखाली एकटे राहण्याने खतपाणी घातलं आणि आता वयाच्या या टप्प्यावर मात्र ते या अवस्थेत आले. वास्तविक याची सुरुवात तिथेच झाली होती.

२५ वयाची एक नवतरुणी खूप स्वच्छंदी आयुष्य जगते. परंतु कोणत्याही नात्यातली बांधिलकी तिला नकोशी असते. याचं कारण ती स्वतः कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. सातत्याने प्रत्येक नात्याकडे साशंकतेने पाहते. याचं कारण वयात येत असताना तिच्या स्वभावात अचानक झालेला बदल; त्यातून उफाळलेला राग, चिडखोरपणा, हे कसं झालं याचं तिला कायम आश्चर्य वाटत राहिलं. यातून तिचा स्वतःवरचा विश्वास कमी झाला आणि त्याच पद्धतीने तो इतर कोणावरही उरला नाही. यातून कोणतंही द़ृढ नातं तयार करावं, हेच तिला वाटत नाही.

वयात होणारे बदल हा आयुष्यातील एक आपसूक टप्पा असेल; तरीही यांमध्ये कुठेही, कसलेही ताण काही समजांच्या रूपाने घट्ट चिकटून राहिले, तर त्याचे परिणाम हे नक्कीच पुढील आयुष्यात जाणवतात.