नोकरी शोधताना...

Last Updated: Jun 03 2020 8:31PM
Responsive image


अनेक महिलांना नोकरी करायची, बदलायची इच्छा असते. पण तसे करताना अनेक चुका त्यांच्याकडून होत असतात. विशेषत: नवी नोकरी शोधताना या चुका जास्त होतात. नोकरी बदलतानाही अनेक चुका घडत असतात, त्याविषयी...

जुना रिझ्युम : श्रुतीने नवी नोकरी शोधायला सुरुवात केली. तिला तिचा रिझ्युम आज ई-मेल करायचा आहे. यावेळीही ती आपला जुना रिझ्युम पाठवण्याच्याच तयारीत होती. जेव्हा तिच्या एका मैत्रिणीने त्याबद्दल तिला विचारले, तेव्हा तिच्या ते लक्षात आले. 

तुम्हाला तुमच्या पसंतीची नोकरी हवी असेल, तर दर तीन-चार महिन्यांनी तुम्ही तुमच्या रिझ्युमेत आवश्यक ते बदल करा. 

नोकरीसाठी नेटवर्कचा उपयोग करून घ्या : फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि अशा कितीतरी सोशल नेटवर्किंग वेबसाईट आपल्या दिमतीला उभ्या आहेत. त्यांचा उपयोग करून तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही नोकरी मिळवू शकता. या साईट्सवर असलेले तुमचे मित्र नोकरी शोधण्यात तुमची मदत करू शकतात. 

इंटरव्यूत द्या तुमची खरी ओळख :

इंटरव्यू म्हणजे नुसती प्रश्नोत्तरे नसतात. त्यावेळी तुमची क्षमता, तुमचा स्वभाव, एकूणच तुमचे व्यक्तिमत्त्व जोखले जाते. तुमच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा असेल याचाही विचार त्यावेळी कंपनीचे प्रतिनिधी करत असतात. म्हणूनच इंटरव्यूसाठी जाताना तुम्ही आहात तशाच जा. उगाच इंटरव्यूसाठी म्हणून व्यक्तिमत्त्वात बदल घडवू नका. शिवाय इंटरव्यूच्यावेळी तुमच्या जुन्या कंपनी किंवा बॉसबद्दल वाईट बोलू नका. 

आर्थिक बाजू : बहुतांश महिलांना वेतन काय आहे हे माहीत असते. पण त्या वेतनाशी निगडित इतर बाबी म्हणजे बोनस, पेन्शन याविषयी फारशी माहिती नसते. नव्या नोकरीत पगार किती वाढवून हवा आहे, याचीही विशेष माहिती नसते. या सगळ्या बाबी आपल्याला नीट माहिती असायला हव्यात. त्याचबरोबर नव्या नोकरीत तुम्हाला जितके वेतन हवे आहे, त्यापेक्षा थोडे जास्तच मागा. 

पहिल्या नोकरीत गुंतून पडू नका :

तुम्हाला दुसरी चांगली नोकरी मिळण्याची संधी आहे. अशा वेळी आपली पहिली नोकरी सोडण्याची मनाची तयारी करा. 

पहिल्या नोकरीच्या ठिकाणी असलेले मित्र-मैत्रिणी, घरासारखेच वातावरण असलेले ऑफिस सोडून दुसरीकडे जाण्याच्या विचाराने तुम्ही अस्वस्थ होत असाल, तर आधी स्वत:ला बदला. कारण तुमची स्वप्ने पूर्ण होण्याच्या संधी मिळत असताना कारण नसताना भावनेच्या आहारी जाऊन त्या संधीवर पाणी सोडण्याने तुमचेच नुकसान होते हे लक्षात घ्या. 

कामांचे श्रेय घ्या : जुन्या नोकरीत तुम्ही जी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असेल, तर त्याबद्दल नव्या नोकरीच्या ठिकाणी स्पष्टपणे सांगा. अनेकदा उगीच कशाला आत्मस्तुती म्हणून न बोलणे म्हणजे तुमच्या बढती आणि पगारवाढीवर पाणी सोडण्यासारखे होईल. इंटरव्यूमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्ही मिळवलेले यश सांगायला विसरू नका.