Sat, Jan 23, 2021 07:32होमपेज › Kasturi › चंचल मुलांना सांभाळताना...

चंचल मुलांना सांभाळताना...

Last Updated: Nov 06 2019 8:15PM
विधिषा देशपांडे

लहानपणी मुले खोड्या करतात, दंगा करतात. ते स्वाभाविकच असते. पण हा व्रात्यपणा प्रमाणाबाहेर असेल, तर मात्र पालक चिंताग्रस्त होतात. काही मुले खूप चंचल असतात. एके जागी फार काळ बसूच शकत नाहीत. काही ना काही उपद्व्याप केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. बागेतील फुले चुरगळणे, खिडकीची, कारची काच फोडणे वगैरे गोष्टी ही मुले करत असतात. शाळेतला अभ्यास नीट करत नाही. 

जबरदस्तीने अभ्यासाला बसवले तर अर्धामुर्धा अभ्यास कसाबसा करतात. शाळेतही त्यांचे अभ्यासात लक्ष नसते. अशा एक ना अनेक तक्रारी या मुलांबद्दल असतात. पण या मुलांच्या वागण्याला टीव्ही किंवा पालकांचे वळण ही कारणे नाहीत. कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर त्यासाठी गरज असते ती एकाग्रतेची.त्याबरोबरच संयम आणि सहनशीलतेची. पण काही मुलांमध्ये हे गुण नसतात. त्यांनाच एडीएचडी म्हणजे अटेन्शन डेफिसीट हायपर अ‍ॅक्टिव्हीटी म्हणून निदान केले जाते. ही मुले खूप चंचल वृत्तीची असतात. त्यांना शाळेत चांगले मार्क मिळत नाहीत कारण मन एकाग्र होत असल्याने शाळेत शिकवलेले ते समजूच शकत नाहीत. पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांची बुद्धिमत्ता कमी असते. मनाने ही मुले खूप उतावीळ असतात आणि मनाजोगे काही घडले नाही तर आकांडतांडव करतात. हा आजार मेंदूतील रासायनिक बदलामुळे किंवा अनुवंशिकतेमुळे आढळतो. औषधोपचार आणि बिहेविरल थेरपी एकत्रितपणे केल्यास चांगला प्रभाव पडतो. या मुलांसाठी करता येण्याजोग्या गोष्टी - त्याला दैनंदिन वेळापत्रक आखून द्या. त्यात त्याची उठण्याची, नाश्त्याची, अभ्यासची आणि खेळाची वेळ ठरलेली असावी. त्या वेळापत्रकाप्रमाणे तो आचरण करत असेल तर त्याबद्दल त्याला कौतुकाने छोटेसे बक्षीस द्या. जेणेकरून   त्याला प्रेरणा मिळेल. 

अभ्यास करताना मधे मधे ब्रेक द्यावेत. त्या ब्रेकमध्ये तुम्हीही त्याच्याबरोबर खेळले पाहिजे. सतत शिस्तीचा बडगा दाखवण्यापेक्षा हसत खेळत त्याच्याकडून कामे करून घ्यावीत. काय करू नये याची उजळणी करण्यापेक्षा त्याने काय केले पाहिजे, हे त्याच्या मनावर बिंबवावे.

अतिउत्साहीपणा किंवा अतिक्रियाशीलता कमी करण्यासाठी त्याची ऊर्जा जिथे वापरली जाईल, अशा खेळाच्या वा कलेच्या प्रशिक्षणासाठी त्याला पाठवावे. उदा. बँडमिंटन किंवा डान्स क्लास. पण हे सर्व करण्याआधी पालकांनी मुलांना समजून घेणे आवश्यक आहे.