Fri, Nov 27, 2020 22:41होमपेज › Kasturi › एकटं एकटं वाटतंय?

एकटं एकटं वाटतंय?

Last Updated: Oct 09 2019 9:14PM
आपण आयुष्यात सर्वार्थाने एकाकी पडलो आहोत, असे वाटून मनात निराशेचे ढग दाटून येतात का? मग या गोष्टी करून पाहा...• फिरायला जाणे, ओळखी वाढवणे, छंद जोपासणे अशा नित्यनव्या गोष्टी आयुष्याला नवीन दिशा देतात. इंटरनेटवर तर माहिती भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. कधी अधूनमधून मनाची गुंतवणूक म्हणून इंटरनेट सर्फिंगचाही लाभ घ्या. •  स्वतःला अपराधी मानू नका. स्वत:ला कोसत बसू नका. कदाचित यामुळे नैराश्यही येऊ शकते. प्रश्‍नांवर मात करण्याची ऊर्जा मनाशी बाळगा. त्यातच तुमचे हित आहे.

• एकाकीपणा काहीवेळा माणसाला व्यसनांच्या दिशेने नेतो. सुरुवातीला टाईमपास म्हणून, कंपनी म्हणून सुरू झालेले मद्यपान वा धूम्रपान कधी आपल्याला व्यसनात गुरफटून टाकते, ते लक्षात येत नाही. त्यामुळे नेहमीच सावध राहा. स्वतःला मद्यपाशात अडकवू नका. • आपल्या भवतीचे जे लोक आनंदी दिसतात ते स्वतःला व्यस्त ठेवायला शिकलेले असतात. त्यामुळे तुम्हीही स्वत:ला आनंददायी गोष्टींमध्ये गुंतवा.• आपल्या अवतीभवती जर निरीक्षण केले तर अनेकदा असे दिसते की, सेवानिवृत्त व्यक्‍ती एकटेपणाच्या पाशात अडकल्या की स्वतःला खूप अडचणीत आणतात. काही खुर्चीत बसून फक्‍त आकाशाकडे पाहत राहतात, तर काही फक्‍त टीव्हीत मन रमवतात. समाजापासून तुटणं हे मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य नाही हे अशा व्यक्‍तींनी समजून घेतले पाहिजे.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि एकाकीपण टाळायचे तर आपल्याला समाजात मिसळण्याशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांनी जाणले पाहिजे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या एखाद्या गटात सहभागी होण्याचा, आपल्या आवडीच्या कार्यक्रमांना जाण्याचा, चर्चासत्र, परिसंवाद यात सामील होण्याचा, नवीन लोकांशी ओळख वाढवण्याचा पर्यायही अमलात आणून पाहता येईल.• नुसता वेळ काढणेदेखील चांगले नाही. स्वत:ला प्रेरणा देण्यासाठी चांगले संगीत, कविता, विनोद आणि पुस्तके यांसारख्या सकारात्मक साधनांचा वापर करा. जास्त झोप काढणे, अती टीव्ही पाहणे ही काही फारशी सकारात्मक गुंतवणूक नाही. त्यापेक्षा आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ देणे कधीही उपकारक.

• अगदीच बाकी काही नाही, तर आपल्या नजीकच्या बागेतल्या हास्यगटात सामील होता येईल. म्हणजे एकाकीपणही कमी होईल. मित्र तर मिळतीलच पण सोबतीला मिळेल मनसोक्‍त हसण्याचा आनंदही! • आजघडीला जगात असे खूप लोक आहेत; ज्यांना मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे आपला एकाकीपणा बाजूला सारून त्यांना मदत करण्याचा पर्यायही तुम्ही निवडू शकता. कदाचित त्यांचे दु:ख पाहून तुमचा एकटेपणा दूर सरेल किंवा त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही झोकून दिले तर आपण एकटे आहोत, हा तुमच्या मनात रेंगाळणारा निराशादायी विचार आपोआप कुठल्या कुठे निघून जाईल.