Thu, Jan 23, 2020 05:58होमपेज › Kasturi › अतिकौतुक नको 

अतिकौतुक नको 

Published On: Sep 12 2019 1:58AM | Last Updated: Sep 12 2019 1:58AM
स्वाती देसाई

आपल्या मुलांनी एखादं चांगलं काम केलं की, त्याचं कौतुक करावंसं वाटणं स्वाभाविक आहे. पण, त्यामध्ये फाजीलपणा आणि अतिशयोक्‍ती नको. मुलांच्या भविष्यासाठी ते घातक ठरू शकतं. 

आईवडिलांनी मुलांचं कौतुक करण्यापूर्वी दोन-तीन वेळा विचार करावा. कारण ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच लागलेल्या एका शोधानुसार मुलांना जरूरीपेक्षा जास्त मिळणारे कौतुक किंवा प्रतारणेचा मुलांवर गंभीर परिणाम होतो. ऑस्ट्रेलियन कॅथलिक युनिव्हर्सिटीचे संशोधक टोनी नोबेल यांनी  केलेल्या संशोधनानुसार मुलांचे कौतुक किंवा त्यांची प्रतारणा यांच्याशी मुलांचा आत्मविश्‍वास जोडलेला असतो. ज्या मुलांचं कौतुक जास्त केलं जातं, ती मुलं इतर मुलांना आपल्यापेक्षा कमी दर्जाची समजतात आणि स्वत:ला खूप खास असल्याचं समजतात. हा एक गैरसमज आहे की,  स्वत:मध्ये काही कमी असलेली मुलंच इतर मुलांना चिडवतात किंवा कमी लेखतात.

जर तुम्ही तुमच्या मुलांमध्ये विशेष अधिकाराची भावना जागवत असाल तर त्यांच्यात ही भावना निर्माण होते की, मला जी वस्तू हवी आहे ती मला मिळालीच पाहिजे.  यामुळे मुलांच्यात दांडगटपणा आणि आक्रमकता वाढते. म्हणून आईवडिलांनी मुलांचं कौतुक वास्तविक आणि खरं करावं. त्यात अतिशयोक्‍ती असू नये. त्याचबरोबर आईवडिलांचं आपल्या मुलांवर नियंत्रण असावं. मुलांना खरी परिस्थिती नेहमी सांगत रहावी.  त्यामुळे त्यांना हे समजेल की, चुका करणे किंवा नापास होणे म्हणजे वाईट गोष्ट नव्हे, तर  चुका याच आपल्याला पुढे योग्य मार्ग सुचवतात आणि आपण जास्त चांगली प्रगती करू शकतो.

थोडक्यात  आईवडिलांनी मुलांचं कौतुक करताना, तसंच त्यांची प्रतारणा करताना  नेहमी संयम ठेवावा. कारण अतिकौतुक जसं फाजील आत्मविश्‍वास वाढवितो तसंच अतिप्रतारणा किंवा नावं ठेवणं हेही अनेक मुलांचा आत्मविश्‍वास कमी करण्यासाठी कारण ठरते. त्यातून मनाने हळवी असलेली मुलं पुढे जाऊन आपल्या आयुष्याचा शेवट करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.