Tue, Sep 22, 2020 07:33होमपेज › Kasturi › मुले, सोशल मीडिया आणि तुम्ही

मुले, सोशल मीडिया आणि तुम्ही

Last Updated: Jun 03 2020 8:35PM
जान्हवी शिरोडकर

आता अगदी बालवयात मुलांना सोशल मीडियाशी इंटरअ‍ॅक्ट करता येते. पूर्वीच्या काळी मुले खेळताना धडपडतील, मारामारी करतील, त्यांचे मित्र-मैत्रिणी कशी असतील, याची चिंता सतावत असे. आता सोशल मीडियाला चिकटून बसलेल्या मुलाला किंवा मुलीला त्यापासून दूर कसे करायचे, त्यावर तो/ती काय पाहतो काय नाही, त्याने/तिने काय पहावे काय नाही, अशा सगळ्या चिंता भेडसावत असतात. 

सोशल मीडिया आता प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे; अगदी मुलांच्या आयुष्याचाही. हे वास्तव जाणून मुलांच्या सोशल मीडिया हाताळण्याच्या बाबीकडे पहा. त्याचा मुलांच्या वागण्यावर सकारात्मक परिणाम होईल आणि सोशल मीडिया हाताळतानाही ती जबाबदार राहतील. पण त्यासाठी पालक म्हणून तुम्हाला काही जबाबदारी पार पाडावी लागेल. 

मुलांवर सकारात्मक प्रभाव टाका

जेव्हा पालक काही गोष्टी करताना किंवा बोलताना मुले पाहतात किंवा ऐकतात, तेव्हा त्याप्रमाणे वागण्याचा ती प्रयत्न करत असतात. तुम्हाला इंटरनेटचा, सोशल मीडियाचा वापर करताना ती पाहत असतात. तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता तेव्हा, एरवी गप्पा मारताना त्याबाबत बोला. उदाहरणार्थ, ‘आज मला फेसबुकवर एक आमंत्रण मिळाले; पण मी ते स्वीकारले नाही, कारण आमंत्रण देणार्‍याची आयडेंटीटी मला योग्य वाटली नाही आणि आपण आपले सुरक्षित राहिलेले बरे. किंवा हा फोटो मी पोस्ट करणार नाही, कारण हा बराच पर्सनल आहे आणि सगळ्या जगाने तो पाहून त्यावर इतरांनी काही कॉमेंटस् करणे योग्य ठरणार नाही.’ तुमच्या अशा वागण्या बोलण्याचा मुलांच्या वागण्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि मुलेही सोशल मीडिया हाताळताना आपोआपच सजग होतात. 

मुलांवर नियंत्रण ठेवण्याचा द़ृष्टिकोन टाळा

तुमची मुले सोशल नेटवर्किं ग करतात म्हणून फार चिंताग्रस्त होऊन मुलांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मुलांच्या खासगीत्वाचा (प्रायव्हसी)चा आदर करा. 
बर्‍याचदा मुले या साईट्सवर फार वेळ घालवत आहेत असे दिसले की आपलीच चिडचिड होते. मुलांनाही आपण ओरडतो. पण मुलांवर विश्वास ठेवा. मुलांचे लॅपटॉप्स किंवा आयपॅड्स त्यांच्या अनुपस्थितीत तपासण्याची अनेक आयांना सवय असते. त्यापेक्षा तुमचे मूल जेव्हा ऑनलाईन असेल तेव्हा त्याच्यावर लक्ष ठेवा. तो/ती काय करत आहे यात रस दाखवा, कुतूहल दाखवा, त्याच्या/तिच्या मित्र-मैत्रिणींची ओळख करून घ्या. पण हा रस दाखवण्यातही संयम दाखवा. मात्र तुमची मुले ऑनलाईन काय करत आहेत, याचे ज्ञान तुम्हाला असायलाच हवे. 

मुलांबरोबर मैत्री करा

किशोरवय हे अतिउत्साहाचे आणि संयमाची कमतरता असणारे असते. अशा वेळी मुलांकडून चुका होऊ शकतात. मुलांबरोबर मोकळेपणाने वागा. जी मुले त्यांच्या पालकांना घाबरत नाहीत आणि सर्व काही त्यांच्याबरोबर बोलू शकतात, त्यांना पालकांपासून काही लपवण्याची गरज वाटत नाही. नेटवर अयोग्य फोटो टाकल्याने त्याच्या/तिच्याबाबतचे मत चांगले होणार नाही, याची जाणीव त्यांना करून द्या. तुमची समाजात चांगली कीर्ती असणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांना समजावून सांगा. एखाद्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेताना, नोकरी शोधताना तुमची प्रतिमा चांगली असणे कसे आवश्यक असते, हे त्यांना समजावून सांगा. इंटरनेटशी निगडित गुन्ह्यांविषयी, त्यामुळे मुलांचे भविष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, याबाबत त्यांच्याशी चर्चा करा. 

सोशल मीडियावर मुलांना फार वेळ व्यतीत करायला देऊ नका

मुले सोशल मीडियाला चिकटून बसत असतील, तर त्यांना वेळीच आवरा. ही स्थिती त्यांना सोशल नेटवर्किंगचे व्यसन लागल्याची पावती आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठीचे काही नियम ठरवा आणि ते मुलांनी पाळण्याचे बंधन घाला. कॉम्प्युटर दिवाणखान्यात ठेवा आणि मुलांना त्यांचे स्मार्टफोन आणि टॅबलेट्स बेडरूममध्ये नेऊ देऊ नका. सोशल मीडियावर जे काही टाकलेले असते, ते सगळेच विश्वास ठेवण्याजोगे नसते, याचे भान त्यांना द्या. त्यातील आभासी दुनियेची त्यांना जाणीव करून द्या. त्यापेक्षा खर्‍या लोकांना त्यांना भेटवा. मित्रांशीही प्रत्यक्ष संपर्क साधण्याकडे लक्ष द्या. 

मुलांसाठी काही टिप्स

अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत.• मैदानी खेळ खेळा.
कुणालाही तुमची जन्मतारीख, पत्ता, फोन नंबर आणि ई-मेल आयडी देऊ नका. फोटो पोस्ट करताना काळजी घ्या. 
तुमच्या भावना उघड करण्यापूर्वी विचार करा.
इंटरनेट गुन्ह्यांविषयी माहिती घ्या. 
मैदानी खेळ खेळा. कोणत्याही संघटना, शाळा, कॉलेज अथवा व्यक्तींची बदनामी करू नका.

 "