Wed, Jan 22, 2020 22:28होमपेज › Kasturi › मन की बात : तिला माहेरी बोलवा

मन की बात : तिला माहेरी बोलवा

Published On: Sep 12 2019 1:58AM | Last Updated: Sep 12 2019 1:58AM
स्नेहल अवचट

माझं माहेर सावली, उभी दारात माऊली...
तिचा काळजात बाई, माया ममतेचा झरा...

माहेर..! जगातील प्रत्येक स्त्रीचा मनाचा हळवा कोपरा... आठवणींची दाटीवाटी... मायेचा स्पर्श. जिथे आपण खेळलो, बागडलो, आपले हट्ट व लाड पुरवले गेले, तो आठवणींचा सुंदर काळ कायमच स्मृतीत दडलेला असतो... मनाच्या कुपीतील आठवणींचा सुगंधी दरवळ. कधी मन बहरते, तर कधी गलबलून येते. कोणाच्या आयुष्यात अजिबातच नसते, तर कुठे नंतरदेखील भरभरून प्रेमाचा हात तसाच राहतो. तर कोणी कुठे, काही कारणास्तव दुर्लक्षित होऊन जाते. आपल्या पुढच्या पिढीत खूप सारी तयार मते, स्पष्टता, तत्त्वे असली तरी नात्यातील नवा धागा, भावनेतील ओलावा व जिव्हाळा मात्र ती टिकवून आहे. विचारांच्या विविधतेत पण शेवटी नात्यांची जपणूकच तर महत्त्वाची नाही का!

कुळाचार, सण, प्रथा, परंपरा यातील कित्येक गोष्टी श्रद्धापूर्वक केल्या जाण्याचा प्रघात आपल्या संस्कृतीत आहे. त्यातीलच एक म्हणजे गौरी पूजन. भाद्रपदात श्रीगणेशाच्या बहिणी म्हणून या ज्येष्ठा आणि कनिष्ठा भगिनी तीन दिवस आपले माहेरपण करून घेतात व जाताना त्या घरातील स्त्रीला अमाप सुख, समाधान मात्र देऊन जातात. साक्षात लक्ष्मीमातेचे माहेरपण आपल्या हातून होते, ही कल्पनाच किती रोमांचित करणारी असते!

लहानपणापासून श्रावण संपत आला की, आईला गौरी-गणपतीचे वेध लागायचे. त्याआधीच फळीवरचे सर्व पितळी डबे व इतर गोष्टी धुऊन पुसून लख्ख होत असायच्या. गणपती बसले की मोदकाचा फराळ संपला की मग आमच्या शाळा-कॉलेजच्या वेळेनुसार आई करंजाचा घाट घालायची. बाकी रवा लाडू, बेसन लाडू मात्र तिची सर्व कामे सांभाळून रात्रीतूनच हातावेगळी करायची. गौरीच्या तीन दिवसात तिची धामधूम, धावपळ, दगदग अखंड चालू असायची. चटकदार रुचकर पदार्थ, पंचपक्वान्ने यांची रेलचेल असायची. तिसरे दिवशी गौरी विसर्जनाच्या आरतीला तिचा कातर चेहरा खूप काही सांगून जायचा.तिची साक्षात आदिमायेची पाठवणी करताना जणू लेकीची पाठवणी करत डोळ्याच्या ओल्या कडा पुसणारी आपली आई पाहताच आपण सर्व लहानाचे मोठे झालो व जणू आईपणाचे तेच संस्कार होत गेले...

पिढी कोणतीही असू दे. माय लेकींच्या नात्यातील भाव मात्र तोच प्रेमरंगी राहिला आहे! कारण माहेरवाशीण ही संकल्पना पिढी-दरपिढी थोड्याफार फरकाने जरी बदलत असली तरीदेखील माया-ममता-प्रेम-काळजी या भावना आपल्या लाडक्या लेकीसाठी आईच्या मनात कायमच ओतप्रोत भरलेल्या आहेत. तिला आयुष्यात कोणतेही त्रास होऊ नयेत हे आपल्या लेकीसाठीचे मागणे ती कायमच त्या जगन्मातेला मागत असते. ‘आपले सर्वस्व’ असे आपले माहेर सोडून ही लेक जेव्हा सासरी रमते तेव्हा जणू ‘कृष्णा मिळाली कोयनेला’ हा त्या आईचा समाधानी भाव  लेकीलादेखील भावून जातो.
नवीन घरातील रितीरिवाज ती आपसूक अंगवळणी पाडून घेते. शिकत शिकत पुढे जात असते. रितीरिवाज आपल्या वेळ व सोयीचा मध्य काढून जपत असते. परंपरा, पद्धतीत कोणत्याही प्रकारचा अट्टाहास करणे योग्य नसतेच. आजकालच्या धावपळ, दगदग, वेळेची बंधने व घर व ऑफिस या तारेवरच्या कसरतीत प्रत्येक लेक ही जणू अष्टभुजा देवीचे रूपच वाटू लागते. 

आहे त्या परिस्थितीशी हातमिळवणी करून न खचता, न कंटाळता मार्ग काढणार्‍या आपल्या लेकींचा समाधानी चेहरा त्या आईला देवीचे सात्त्विक, समाधानी रूप आठवून देते. कधी दुर्गा, तर कधी पदव्या असलेली देवी सरस्वतीची शिष्या, तर कधी अन्यायाच्या विरोधातील दुर्गा, चंडिका! नाना रूपे, नाना कामे! सणवाराला आपुलकीचे वस्त्र व समाधानाचे अलंकार धारण केलेली आपली लेक जणू  दिव्य दर्शनच  देऊन जाते.

‘आई माझा गुरू, आई कल्पतरू’ म्हणून प्रत्येक लेक आपल्या आईला डोळ्यापुढे ठेवून वागत असते. आलेल्या चढउतारात आईची खेळी लक्षात ठेवूनच एकेक पाऊल टाकत असते. कोणी कधीतरी काही अविचारी वागणे, निर्णय घेतले तरी समजून सांगणारी व प्रसंगी कान धरणारी हीच आई असते. स्वतःचे माहेरपण जपणारी आपलीच आई बघताना तिला कुठेतरी जाणीव होते की, ‘अरे, आपल्या आईला तर आता माहेरपण, विश्रांती हवी आहे.’ कोणत्याही परिस्थितीत आईचा समईचा मंद प्रकाशातील तृप्त समाधानी चेहरा तिला शतशः समाधान देऊन जातो आणि तिच्या मनात येते...

देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते
आईच्या माहेरासाठी लेक सासरी नांदते

आईच्या आवडत्या गोष्टी करणे, तिच्यासाठी आवर्जून वेळ देणे, नाटक-सिनेमा व खाण्यापिण्याचे लाड पुरवणे, तिची आयुष्यात स्वतःसाठी राहिलेली हौसमौज पुरवणे, लहानपणी आपली तब्येत नीट रहावी यासाठी झटणार्‍या आईच्या तब्येतीची व मनाची काळजी घेण्याची जणू हीच योग्य वेळ असते.  
कारण शेवटी,‘

माय भवानी तुझे लेकरू 
कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई
हाच मनीचा भाव असतो, तिचाही आणि आपलाही..!