Wed, Feb 19, 2020 01:58होमपेज › Kasturi › अ‍ॅक्सेसरीजचा ‘भार’

अ‍ॅक्सेसरीजचा ‘भार’

Last Updated: Feb 12 2020 8:51PM
मृणाल सावंत

हल्ली बहुतांश तरुणी-महिला फॅशन अ‍ॅक्सेसरीज रोजच्या आयुष्यात वापरत असतात. मात्र ज्या फॅशन अ‍ॅक्सेसरीज कूल वाटतात, त्या काही वेळा नुकसानकारक असतात. 

स्किनी जीन्स  

स्किनी जीन्समुळे पाय आकारात दिसतात शिवाय उंचीही जास्त वाटते; परंतु स्किनी जीन्समुळे त्वचेला हवा मिळत नाही. ती घट्ट बसत असल्यामुळे सांध्यावर दबाव येतो. त्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. तसेच पोटावरही चांगलाच दाब पडतो. त्यामुळे मेटाबोलिझम किंवा चयापचय क्रियाही मंदावते. स्किनी जीन्सऐवजी सरळ फीट बसणारी जीन्स घालावी. ही जीन्स कंबरेला व्यवस्थित बसते. 

उंच टाचेची पादत्राणे  

उंच टाचेच्या चपला कुणाला आवडत नाहीत; पण त्या आरामदायी बिलकूल नसतात. पाय दुखतात हे लक्षात येऊनही अनेक स्त्रिया रोज उंच टाचेच्या चपला घालतात. पण त्यामुळे शरीराच्या नुकसानाचा अंदाज मात्र लावता येत नाही. दीर्घकाळ रोज हाय हिल्स किंवा उंच टाचेच्या पादत्राणाने शरीराला गंभीर इजा होते. मणक्याला इजा होणे, गुडघे खराब होणे, क्रॅपिंग टोजसारखे नुकसान होते. 

•फ्लिप फ्लॉप्स  

हल्ली बहुतांश महिलांच्या शू रॅकमध्ये  फ्लिप फ्लॉप्स असतेच. पण जास्त वेळ ही चप्पल घालून फिरणे आरोग्यासाठी चांगले नाहीच. कारण त्याने पायाला काहीही मदत होत नाही. तसेच हीलमध्ये कुशन असते. त्यामुळेच पायाला वेदना होतात किंवा पायाच्या घोट्याला वेदना होऊ शकतात. त्याशिवाय धूळ आणि प्रदूषण यामुळे घोेटे फाटण्याची भीती असते. त्यामुळेच फ्लिप फ्लॉप्सऐवजी बॅले शूज वापरावेत. 

हेवी किंवा जड दागिने  आपली मान नाजूक असते, त्यावर डोक्याचा भार असतोच. सोबतीला जर जड आणि मोठे दागिने घातले तर भार जास्त वाढतो. त्यामुळे शरीराची ठेवणही बदलते. मोठे जड कानातले घातले तर कान जड होतात. शिवाय कानाचे छिद्रही मोठे होते. त्यामुळे हलक्या वजनाचे पण ट्रेंडी कानातले किंवा गळ्यातले घालावे. 

खूप मोठ्या टोटे बॅग्ज  

खूप मोठ्या टोटे बॅग्ज स्टायलिश असतात आणि उपयोगीही असतात हे खरे आहे. त्यामध्ये गरजेपाक्षा थोडे जास्त सामान भरून बाहेर जाता येते. दररोज या मोठ्या बॅगा वापरल्या तर त्याचा भार खांदे, मान, पाठ यांच्यावर पडतो आणि वेदनांचे कारण ठरू शकते. त्यामुळे मोठ्या टोटे बॅग घेताना त्या आलटून पालटून दोन्ही खांद्यावर घ्याव्यात.