Mon, Jul 06, 2020 15:10होमपेज › Jalna › जुई धरणातून पाणी चोरी सुरूच

जुई धरणातून पाणी चोरी सुरूच

Published On: Mar 14 2018 1:14AM | Last Updated: Mar 14 2018 1:14AMभोकरदन : प्रतिनिधी

शहरासह अठरा ते वीस गावांना पाणीपुरवठा करणार्‍या दानापूर येथील जुई धरणातून पाण्याची चोरी सुरूच आहे. सध्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्याचा आरोप होत आहे. पाणी चोरी अशीच सुरू राहिली तर भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहू शकते. याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

तीन ते चार वर्षांपासून धरण भरले नव्हते, मात्र मागच्या जून-जुलैमध्ये परतीच्या पावसाने जुई धरणात मोठा पाणीसाठी आला. भोकरदन शहरासह दानापूर, तळणी, वीरेगाव, कठोराबाजार, वरूड, पिंपळगाव, दगडवाडी, देहेड, मूर्तड, वडशेद, सिपोरा बाजार, निंबोळा, भायडी, मनापूर, करजगाव या गावांना या व इतर काही गावांना  याच धरणाच्या पात्रातील विहिरीतून पाणीपुरवठा होता.  धरणातील पाणीपातळी कमी होण्यास सुरुवात झाली असून, केवळ सहा फूट पाणीसाठा शिल्लक आहे.  धरणातील बाजूच्या विहिरीतून तसेच धरणातून शेतीसाठी परिसरातील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकदा प्रशासनाने या भागातील रोहित्र बंद करून कारवाई केलेली आहे. धरणाच्या पात्रात सायंकाळी साडेपाच नंतर विद्युत मोटारी सोडून वारेमाप पाणी उपसा केला जात आहे. उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून देण्यात येणार्‍या गावांना पाणी राखीव ठेवण्याची गरज आहे.

पाणी चोरी रोखण्यात पालिकेला अपयश
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जुई धरणातील पाणी चोरी रोखण्यात नगरपालिकेला अपयश आल्याचे दिसत आहे. केवळ कागदोपत्री घोडे नाचवल्याने पाणी चोरी रोखल्या जाणार नाही, तर त्यासाठी ठोस कारवाई करावी लागेल, असे मत शहरवासियांच्या वतीने व्यक्‍त केले जात आहे.

गाळ काढल्याचा फायदा
गतवर्षी उन्हाळ्यात प्रशासनाच्या वतीने जुई धरणातील गाळ काढण्यात आला. यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा झाला. यामुळे परिसरातील विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्याचा फायदा खरीप व रब्बी हंगामासाठी झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.