Mon, Jul 06, 2020 15:45होमपेज › Jalna › राजूर पाणी पुरवठ्यासाठी 50 लाखांचा निधी

राजूर पाणी पुरवठ्यासाठी 50 लाखांचा निधी

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 05 2018 11:08PMराजूर : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र राजूर येथील ग्रामस्थांना व भाविकांना मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो. ग्रामस्थांना सध्या चांदई एक्को मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ग्रामस्थांची कायमस्वरूपी तहान भागविण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तातडीच्या पाणीपुरवठा योजनेमार्फत बाणेगाव मध्यम प्रकल्पातून राजूरसाठी  50 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.  खासदार रावसाहेब दानवे यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष प्रयत्न केले. 

मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे भाविक व ग्रामस्थांना विकत पाणी घ्यावे लागते. कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची होती. नूतन सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम  पाणीपुरवठा योजनेसाठी प्रयत्न सुरू केले. सरपंच भाऊसाहेब भुजंग, माजी जिल्हा परिषद सदस्य रामेश्‍वर सोनवणे, उपसरपंच विनोद डवले, ग्रामपंचायत सदस्य राहुल दरख यांनी खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे पाणीपुरवठा योजना मंजुरीकरिता पाठपुरावा सुरू केला. तातडीच्या पाणीपुरवठा योजनेमार्फत राजूरसाठी बाणेगाव मध्यम प्रकल्पातून  पाणी आणण्यासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. पाणीपुरवठा योजना 9 किलोमीटरची असणार आहे. या योजनेमुळे ग्रामस्थांचा  कायमस्वरूपी पाणी प्रश्‍न सुटणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे भुजंग यांनी सांगितले.