Fri, Jul 03, 2020 18:40होमपेज › Jalna › पाणीटंचाई पाणंदमुक्तीच्या मुळावर

पाणीटंचाई पाणंदमुक्तीच्या मुळावर

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 04 2018 11:37PMभोकरदन : विजय सोनवणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच ग्रामीण महाराष्ट्र पाणंदमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार भोकरदन तालुका पाणंदमुक्त झाला आहे, मात्र तालुक्यतील पाणीटंचाईग्रस्त पण पाणंदमुक्त झालेल्या गावांना सध्या पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. अवर्षणामुळे पिण्यासाठी व वापरण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे घरात शौचालय असूनही पाणी बचतीसाठी अनेक कुटुंबीयांना उघड्यावर शौचवारी करावी लागत आहे. तालुक्यातल्या ग्रामीण भागातील सध्याचे हे वास्तव आहे. 

स्वच्छ भारत अभियान हा केंद्राचा अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागात गाव , तालुका व सरतेशेवटी तालुका पाणंदमुुक्त करण्यावर शासनाने जोर दिला. 
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ग्रामीण भागात घराघरांत शौचालयाची निर्मिती व्हावी यासाठी शासन-प्रशासनाने युध्दपातळीवर प्रचार व प्रसार करून गोरगरीब कुटुंबीयांना शौचालय बांधण्यासाठी अनुदानही उपलब्ध करून दिले. 

तसेच अनुदान घेऊनही शौचालय न बांधणार्‍यांवर प्रसंगी कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. अखेर शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने केलेल्या या प्रयत्नांना सुरुवातीला भोकरदन तालुका पाणंदमुक्त झाल्याने मोठे यश प्राप्त झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही गावे पाणंदमुक्त झाले, मात्र पाणीटंचाईच्या दुर्भिक्ष्यामुळे सध्या तालुक्यात या घोषणेला सुरुंग लागत असल्याचे चित्र आहे.
एकूणच भोकरदन तालुक्यात विविध गावात मध्यम व तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईची झळ सोसत आहेत. पाण्यासाठी मैलामैल भटंकती करावी लागत असल्याने ग्रामस्थांना पाण्याची कटकसरीने वापर करीत आहे. त्यासाठी बहुतांश कुटुंबीयांकडून उघड्यावर शौचवारी केली जात असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.