Mon, Jul 06, 2020 13:48होमपेज › Jalna › अविवाहित गर्भवती मुलीचा पित्यानेच केला खून

अविवाहित गर्भवती मुलीचा पित्यानेच केला खून

Published On: Nov 28 2018 1:21AM | Last Updated: Nov 27 2018 11:44PMभोकरदन  : प्रतिनिधी

लग्नाआधी गरोदर राहिल्याने  पित्याने पोटच्या मुलीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना धावडा- मेहेगाव रोडवर सोमवारी सकाळी उघडकीस आली.  छाया समाधान डुुकरे (20)  असे मृत तरुणीचे नाव आहे.पोलिसांनी  या प्रकरणी आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात उभे केले असता 1 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत छायाचा पिता समाधान नामदेव डुकरे वय (49) (रा.जांब, ता.जि.बुलडाणा), मावशीचे पती कचरू महादू उगले (43) (रा. रुईखेड मायंबा ता. जि. बुलडाणा), अण्णा पुंजाजी लोंखडे (48) (रा. सोनगिरी), छायाचा आते भाऊ रामधन उत्तम दळवी (19) (रा. येवता ता. जाफराबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

भोकरदन तालुक्यातील धावडा- मेहेगाव रोडवर सोमवारी सकाळी छाया समाधान डुकरे या तरुणीचा मृतदेह काही लोकांना दिसुन आला होता. यानंतर या घटनेची पारध पोलिसांना  माहीती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पारधपोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत,  उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, कर्मचारी रामेश्‍वर शिनकर, गणेश पायघन, सागर देवकर, जगदीश बावणे, लक्ष्मण चौधरी, विकास जाधव, बनकर यांच्यासह इतरांनी तातडीने घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला. तपासात मृत छाया लग्नाआधी गरोदर राहिल्याने तिचे वडील समाधान डुकरे याने नातेवाईकांच्या मदतीने तीचा खून केल्याचे उघडकीस आले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तरुणीच्या वडिलासह चारजणांना अटक केली असुन पोलिस प्रियकर शुभम वराडेचा शोध घेत आहे.तरुणाचा खुन अनैतीक संबधातुन झाला  असावा असा अंदाज पोलिसांनी काढला होता.  मयत छायाजवळ सापडलेल्या एटीएम व पॅनकार्डवरुन ती बुलढाणा जिल्ह्यातील जांब येथील असल्याचे समोर आले. तपासा दरम्यान नातेवाईकांनी पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. 

प्रेमसंबंधातून तीन महिन्यांचा गर्भ 

दरम्यान प्रकरणातील मृत छाया ही पुण्यात खासगी नोकरी करून शिक्षण घेत असताना शुभम वराडे (रा. भुसावळ) याच्याशी तिचे प्रेमसंबध जुळले होते. दोघांच्या संबंधातून छाया गर्भवती राहिली. दिवाळीनिमित्त सुट्या असल्याने ती घरी आली असता तिने आई-वडिलांना याची माहिती दिली. यानंतर घरच्या लोकांनी छायावर शुभमविरुद्ध तक्रार कर, असा दबाव टाकण्यास सुरुवात केली, पण छाया त्यांना जुमानत नव्हती असे सांगण्यात येत आहे. दरम्यान आरोपींनी मेहगाव शिवारातच  छायाचा खून करण्याचा बेत आखला होता.