Fri, Jul 03, 2020 19:12होमपेज › Jalna › अनोळखी व्यक्तीचा खून

अनोळखी व्यक्तीचा खून

Published On: Mar 08 2018 12:39AM | Last Updated: Mar 08 2018 12:38AMआष्टी : प्रतिनिधी

परतूर तालुक्यातील गंगासावंगी येथे अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचे हातपाय बांधून दगडाच्या साह्याने मृतदेह गोदावरी नदीत फेकण्यात आला. हा मृतदेह शनिवारी सकाळी तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृताचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून  करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी दिलेली माहिती अशी की, गंगासावंगी येथील आष्टी-माजलगाव रस्त्यावरील पुलाजवळ गोदावरी नदीपात्रात मृतदेह तरंगलेला आढळल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली. मृताचे अंदाजे वय चाळीस ते पंचेचाळीस वर्षे आहे. मृतदेह गावकर्‍यांच्या मदतीने पोलिसांनी बाहेर काढला. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ झालेला असल्याने मृतदेह कुजला होता. त्यामुळे ओळख पटविणे कठीण जात आहे. घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले.

गावकर्‍यांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने सुताच्या दोरीच्या साह्याने मृतदेहाचे हातपाय बांधून त्यास दगडाच्या साह्याने नदीत फेकला असावा. अंगावर पांढरा शर्ट व काळी पॅन्ट असून या बाबत कोणाला माहिती असल्यास आष्टी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जमादार अनंत नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि विनोद इज्जपवार करीत आहेत.