Fri, Nov 27, 2020 10:37



होमपेज › Jalna › जालना : तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

जालना : तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू; एकाचा तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

Last Updated: Nov 19 2020 2:16PM




एकाचा ३ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

भोकरदन : पुढारी ऑनलाईन 

तालुक्यातील पळसखेड पिंपळे येथील तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली. तिघे भाऊ शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्याची माहिती असून यातील एकाचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पळसखेड पिंपळे येथील ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (वय २६), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (वय २६) व सुनील आप्पासाहेब जाधव (वय १८)  या तिघा भावांनी बुधवारी रात्रीचे जेवण केले. नंतर ८ वाजण्याच्या दरम्यान शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले. पाणी देण्यासाठी एकाने विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला विद्युत धक्का बसून तो विहिरीत कोसळला. इतर दोघांनी त्याला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र, विहिरीत विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने तिन्हीही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

आपली मुले रात्री उशीर झाला तरी घरी परतले नाही म्हणून नातेवाईकांनी त्यांना मोबाईल केले. तिघांचे मोबाईल लागले पण, फोन उचलत नसल्याने नातेवाईकाची चिंता वाढली. त्यानंतर मध्यरात्री २ वाजता नातेवाईक शेतात गेल्यानंतर तिघेही विहिरीत बुडल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष घोडके यांनी घटनास्थळी पाहणी केली. 

ऐन सणासुदीच्या काळात पळसखेडा पिंपळे तिन्ही सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी सगळीकडे पोचल्यावर गुरुवारी पहाटेपासून त्या गावात नातेवाईकांची गर्दी वाढली होती. या तिघांपैकी ज्ञानेश्वरचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. आप्पासाहेब जाधव यांना तीन मुले आहेत.  इतर दोन मुले औरंगाबाद येथे कंपनीत काम करत होते. लॉकडाऊनपासून ते घरी आले होते. तीन कर्त्या मुलांच्या मृत्यूने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.