Fri, Jul 03, 2020 18:12होमपेज › Jalna › जाफराबादेत दुचाकी अपघात तीन ठार

जाफराबादेत दुचाकी अपघात तीन ठार

Published On: May 14 2019 11:30PM | Last Updated: May 14 2019 11:30PM
जालना : प्रतिनिधी 

भरधाव वेगाने जाणारी मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात तीन युवक ठार झाल्याची घटना जाफराबादनजिक सोनगिरी पाटीजवळ मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. सचिन भगवान शेळके (वय, 19), अमोल माधवराव बकाल (20) आणि समाधान रामू चौंडकर(19) अशी मृत्‍यू झालेल्‍यांची नावे आहेत. 

मृत तिन्ही युवक कोळेगाव येथील रहिवासी आहेत. या अपघातात सचिन शेळके, अमोल बकाल यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेला समाधान चौंडकर(19) यास औरंगाबादकडे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोळेगाव येथील तीन मित्र स्टार सिटी मोटारसायकलवर (क्रमांक एम.एच.21 के 5030) सकाळी आपले शैक्षणिक आधार कार्ड व इतर कागदपत्रे ऑनलाइन दुरुस्ती करण्याच्या कामासाठी जाफराबादला आले होते. आपले काम आटोपून जाफराबाद येथून कोळेगावकडे परत जात असताना जाफराबाद चिखली मार्गावर सोनगिरी पाटी ते गजानन महाराज मंदिराजवळ त्यांची मोटारसायकल घसरली. त्यामुळे तिघेही खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या युवकांच्या मृत्यूची वार्ता कळताच कोळेगाव येथील ग्रामस्थांनी जाफराबाद रुग्णालयात गर्दी केली. त्यांचे शवविच्छेदन करून रात्रीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.