Tue, Jun 15, 2021 12:30होमपेज › Jalna › शिक्षकांच्या जागांचा प्रश्‍न बनणार गंभीर 

शिक्षकांच्या जागांचा प्रश्‍न बनणार गंभीर 

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 1:09AMजालना : प्रतिनिधी 

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या व रिक्‍त जागांच्या प्रश्‍नामुळे आगामी शैक्षणिक वर्षाच्या तोंडावरच शिक्षकांचा प्रश्‍न गंभीर बनणार असल्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. जिल्ह्याबाहेर होणार्‍या बदल्यांमधे जेवढे शिक्षक जिल्ह्यातून जाणार तेवढेच शिक्षक बदलून न आल्यास अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या संख्येने रिक्‍त राहणार आहेत.

जिल्ह्यात शिक्षकांची एकूण 6012 पदे आहेत. त्यात 5 हजार 574 पदावर शिक्षक कार्यरत असून 438 पदे रिक्‍त आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून शिक्षकांच्या बदल्याची गडबड ऑनलाइन सुरू झाली आहे. या बदल्यांमधे 248 शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात बदलून जात आहेत. त्यांच्या जागेवर केवळ 60 शिक्षक बदलून येणार असल्याने शिक्षकांची मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या ग्रामीण भागात रिक्‍त शिक्षकांच्या पदांमुळे अनेक शाळांमधे तीन ते चार वर्गांना एक शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे.

त्यामुळे पहिलीच्या विद्याथ्यार्र्ंना तिसरीचा तर तिसरीच्या विद्याथ्यार्र्ंना पहिलीचा अभ्यास करावा लागत आहे. शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा अतिशय मागास आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्यांमुळे रिक्‍त होणारी पदे तसेच या पूर्वीपासून रिक्‍त असलेल्या पदांमुळे शिक्षकांची कमतरता भासणार आहे. जिल्ह्यात 6012 शिक्षकांपैकी मुख्याध्यापकांची 71 पदे, सहशिक्षकांची 148 तर सहशिक्षकांची 219 पदे रिक्‍त असतानाच 248 बदलून जाणार्‍या शिक्षकांपैकी केवळ 60 शिक्षक बदलून येत असल्याची चर्चा आहे, असे झाल्यास रिक्‍त जागा न भरल्याने तसेच बदली होऊन जाणार्‍या शिक्षकांमुळे जवळपास 626 प्राथमिक शिक्षकांची पदे कमी राहण्याची शक्यता आहे. तसे  झाल्यास विद्याथ्यार्र्ंच्या प्राथमिक शिक्षणावरच प्रश्‍नचिन्ह उभे राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया पार पडली आहे. मात्र जालना जिल्ह्यात या प्रक्रियेला उशीर झाल्याने शिक्षकांमध्ये दोलायमान परिस्थिती आहे.


जिल्ह्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्याची कार्यवाही सुरू आहे. 21 मेपर्यंत बदल्यांबाबत निश्‍चित माहिती मिळू शकेल. जेवढे शिक्षक बदलून जाणार तेवढेच शिक्षक बाहेरहून बदलून येणे अपेक्षित आहे
-रवी जोशी, उपशिक्षणाधिकारी 

बदली झालेल्या शिक्षकांना सोडू नये अशी आमची मागणी होती. मात्र मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना बदली झालेल्या शिक्षकांना सोडले, त्यामुळे आता जिल्ह्यातील शिक्षकांचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे. 
- जयमंगल जाधव, जि.प. सदस्य