Thu, Jul 09, 2020 05:04होमपेज › Jalna › गुरुजी वेळेवर येत नसल्याने पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

गुरुजी वेळेवर येत नसल्याने पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:14AMतळणी : प्रतिनिधी 

मंठा तालुक्यातील दुधा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मंगळवारी उशिरा आल्याने पालकांनीच परिपाठ घेऊन शाळेला कुलूप ठोकले. दुसर्‍या दिवशी बुधवारीही शाळेला कुलूपच होते. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देऊन संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दुधा जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. शाळेतील शिक्षक नेहमीच उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे शाळेत तीनच शिक्षक कार्यरत आहेत. तेही कधीच शाळेत वेळेवर येत नाही. याबाबत सरपंचासह शालेय व्यवस्थापन समितीने केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली; परंतु अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही. उलट शिक्षकांना पाठीशी घातले. 

यामुळे संतप्‍त पालक आणि ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी शाळा गाठली. नेहमीप्रमाणे शिक्षक न आल्याने शाळेच्या वेळेनुसार परिपाठ घेऊन शाळा सोडून दिली. त्यानंतर शाळेच्या गेटला कुलूप ठोकले. जोपर्यंत शिक्षकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा पावित्रा पालकांनी घेतला.