Mon, Jul 06, 2020 14:11होमपेज › Jalna › सीईओंच्या दालनासमोर शाळा भरविली

सीईओंच्या दालनासमोर शाळा भरविली

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 10 2018 1:02AMजालना : प्रतिनिधी

जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा केंद्रांतर्गत येणार्‍या मंगरूळ जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत तीन शिक्षकांऐवजी एकच शिक्षक असल्याने संतप्‍त ग्रामस्थांनी सोमवारी विद्यार्थ्यांची शाळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांच्या दालनासमोर भरविली. याची दखल घेत सीईओंंनी दोन शिक्षकांची नेमणूक करण्याचे लेखी आश्‍वासन दिले आहे.  

येथील शाळेत पहिली ते आठवी वर्ग आहेत. 2017-18 च्या संच मान्यतेनुसार एक प्राथमिक व दोन पदवीधर शिक्षक असे तीन शिक्षक पदे मंजूर करण्यात आली,  परंतु संध्या स्थितीत एकच पदवीधर शिक्षक कार्यरत असून दोन जागा रिक्त आहे. यामुळे सध्या एकाच शिक्षकांवर शाळा सुरू आहे. मात्र विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शिक्षण समितीने गट शिक्षणाधिकार्‍यांकडे दोन शिक्षकांची तत्काळ नियुक्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे वारंवार केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने 9 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांच्या दालनासमोर शाळा भरवली. त्यामुळे शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. शिक्षण विभागाने याची दखल घेत शिक्षणाधिकार्‍यांनी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक देण्याचे लेखी आश्‍वासन दिले. यावेळी विद्यार्थ्यांसह सरपंच दगडूबा बोरूडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इस्माईल खॉ इब्राहिम खॉ, शेख महेमूद शेख जहिर आदी उपस्थित होते.

तीन शिक्षकांऐवजी फक्‍त 1 शिक्षक; ग्रामस्थ संतप्त

तीन दिवसांपूर्वी मंठा तालुक्यातील जयपूर केंद्रांतर्गत येणार्‍या केहाळ वडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन शिक्षकांऐवजी एकच शिक्षक आहे. संतप्‍त ग्रामस्थांनी शनिवारी 50 विद्यार्थ्यांची शाळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांच्या दालनासमोर भरविली. यामुळे शाळेतील रिक्त शिक्षकांचा विषय गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे.

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा

भोकरदन : प्रतिनिधी

कायमस्वरुपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी हिसोडा येथील येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि.9)   येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच शाळा भरवली. जोपर्यत  शिक्षक मिळणार तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने शिक्षण विभाग हतबल झाले होते.  गटशिक्षणाधिकार्‍यांनी एक शिक्षक प्रतिनियुक्तीवर पाठवतो, असे आश्‍वासन दिले. 

तालुक्यातील हिसोडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहीली ते चौथीपर्यंत वर्ग असून येथील चाळीस विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक आहे. गेल्या काही महिन्यांपासून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ  यांनी गटशिक्षणाधिकार्‍याकडे मागणी केली. शिक्षण विभागाने या मागणी दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनी विद्यार्थ्याना घेऊन गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच शाळा भरवली. जोपर्यत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही  अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने अधिकार्‍यांची चांगली पंचाईत झाली. गळवारपासून एक शिक्षक देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.