Mon, Jul 06, 2020 07:20होमपेज › Jalna › पहिल्या सरीतच रस्ते चिखलमय !

पहिल्या सरीतच रस्ते चिखलमय !

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 05 2018 10:48PMपरतूर : प्रतिनिधी

शहरात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे पहिल्याच पावसात रस्ते चिखलमय झाले आहेत.

गल्लीबोळातील चांगल्या अवस्थेतील सिमेंट व डांबरी रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून पाईप अंथरण्याचे काम करण्यात येत आहे.  पावसाच्या पहिल्या सरीतच संपूर्ण रस्ते व गल्ली बोळातील वाटा चिखलमय झाल्याने परतूरकरांची मोठी पंचाईत झाली. आणखी मोठ्या पावसात काय होईल याबाबत शहरवासीयांत मोठी चिंताच आहे.

परतूर शहरात गेल्या वर्षभरापासून 43 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. मुख्य रस्त्यावर जवळपास सर्वच ठिकाणी खोदकामे करून पाईप अंथरले गेले आहेत. या कामात मोठ्या प्रमाणात खोदकाम करताना उकरलेली माती रस्त्यावर आहे. यातच 13 कोटीच्या खर्चातून परतूरचे मुख्य मार्ग व पठाणपुरा या भागात सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. यात पठाणपुर्‍यातील काम पूर्ण झाले असले तरीही पूर्वीच्या पातळीपेक्षा या रस्त्याचा पृष्ठभाग तब्बल दीड फूट उंचावर करण्यात आले आहे. 

यामुळे अनेक जुने बांधकाम असलेली घरे रस्ता पृष्ठभागाच्या खाली दबली गेली. आता पावसाळ्यातील वाहणारे पाणी चक्क या भागातील उंचीपेक्षा खोलीवर असलेल्या घरात घुसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भूमिगत गटार योजनेची कामे तत्काळ पूर्ण करण्याची मागणी आहे.