Thu, Jul 09, 2020 02:53होमपेज › Jalna › लग्‍नपत्रिकांवर नेत्यांच्या फोटोंची क्रेझ

लग्‍नपत्रिकांवर नेत्यांच्या फोटोंची क्रेझ

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 10:52PMभोकरदन : विजय सोनवणे

बदलत्या काळानुसार लग्‍नपत्रिकांचा ट्रेंडही बदलत आहे. नवनवीन पत्रिकांच्या डिझाईनसोबतच काही वर्षांत पत्रिकांवर आपल्या आवडत्या नेत्यांचे फोटो छापण्याची क्रेज वाढली आहे. भोकरदन तालुक्यात शेकडो पत्रिकांवर  नेत्यांचे फोटो झळकत आहेत. निवडणूक धूमशानला वेळ असला तरी अनेकांची आतापासूच फिल्डिंग सुरू  असल्याचे चित्र आहे.

पत्रिकेवर विघ्नहर्त्या श्रीगणपतीचा फोटो असायचा. आता काही ठिकाणी विघ्नहर्त्याऐवजी नेत्यांचे फोटो लग्‍नपत्रिकेवर झळकत असल्याने या काळात लग्‍न पत्रिकांचा पॅटर्न बदलला असल्याचे दिसत आहे. नेते खुष करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत चढाओढ दिसत आहे.  लग्‍न म्हटले की, लग्‍न पत्रिका आल्याच. पूर्वी गावोगाव शोधत घरोघरी फिरून लग्‍नाच्या अक्षता वाटून  निमंत्रण दिले जात.

ग्रामीण भागातील बहुतांश पत्रिकेवर नेते मंडळींचे फोटो झळकत आहेत. डिजिटलच्या जमान्यात काही ठिकाणी गणेशाची जागा चक्‍क नेत्यांनीच घेतल्याचे दिसत आहे. काही पदाधिकार्‍यांनी देवाची जागा नेत्यांना दिली की काय, असे चित्र आहे.  वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नमुन्यांच्या पत्रिका सध्या बाजारात आणि घराघरात पाहायला मिळत आहेत. भोकरदन मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे, आ.स ंतोष दानवे व माजी आमदार चंद्रकांत दानवेंचेच वर्चस्व अधिक असल्याचे दिसत आहे. इतर राजकीय नेत्यांपेक्षा काही घरांतील वृद्ध व दिवंगत व्यक्‍तींचे देखील फोटो दिसत आहे. हल्‍ली आताच्या काळात राजकीय नेत्यांची उपस्थिती लागावी म्हणून शुभमुहूर्त देखील बाजूला ठेवल्या जात असल्याचे तालुक्यात दिसून येते.