Sun, Sep 27, 2020 03:58होमपेज › Jalna › जिल्ह्यात वर्षभरात दीड कोटीचा गुटखा पकडला

जिल्ह्यात वर्षभरात दीड कोटीचा गुटखा पकडला

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 05 2018 1:37AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात अन्‍न व औषधी प्रशासन विभागाच्या वतीने अवैध गुटखा विक्री करणार्‍या 17 ठिकाणांवर छापे मारून 1 कोटी 48 लाख 36 हजार 307 रुपयांचा गुटखा गत वर्षभरात जप्‍त करून नष्ट करण्यात  आला. 

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर अन्‍न औषधी प्रशासनाच्या वतीने अवैध गुटखा विक्रेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याने काही प्रमाणात अवैध गुटखा विके्रत्यांना चाप बसल्याचे दिसत आहे. गतवर्षी भोकरदन तालुक्यासह अंबड तालुुक्यात अवैध गुटखा विक्री व साठा करणार्‍यांवर मोठ्या कारवाया करण्यात आल्या. अपुर्‍या कर्मचारी संख्येवर आठही तालुक्यांत कारवाई करताना अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात बुलढाणासह  जवळच्या राज्यातुन  मोठया प्रमाणावर अवैध मार्गाने गुटखा येतो. गुटख्याचा वास येऊ नये यासाठी गुटखा विक्रेते गुटख्यासोबत सुगंधी आगरबत्तीसोबत गुटख्याची वाहतूक करतात. त्यामुळे आता गुटख्यासोबत सुंगधी आगरबत्तीवर लक्ष ठेवले जात आहे.

191 अन्न नमुन्यांची तपासणी, 17 मध्ये कमी दर्जा 

जिल्ह्यात 2 हजार 529 परवानाधारक तर 12 हजार 850 नोंदणीकृत व्यावसायिक आहेत. अन्‍न व औषधी प्रशासनाच्या वतीने गतवर्षी विविध हॉटेल्ससह इतर ठिकाणांहून घेण्यात आलेल्या अन्न नमुन्याच्या तपासणीत 191 नमुन्यांपैकी 17 नमुन्याचा दर्जा कमी असल्याचे आढळून आले. या प्रकरणात तडजोड दंड 12 हजार रुपये ठोठावण्यात आला. न्यायालयाकडून 12 लाख रुपयांचा दंड विविध प्रकरणात मागील वर्षभरात ठोठावण्यात आला. गतवर्षी करण्यात आलेल्या 27 हॉटेलच्या तपासणी करण्यात आल्या. त्यातील 17 हॉटेलचालकांना सुधारणी नोटीस पाठविण्यात आल्या तर 10 हॉटेल चालकांना परवाना नसल्याबाबत नोटीसा पाठविण्यात आल्या.