Mon, Jul 06, 2020 14:34होमपेज › Jalna › कार्टूनच्या दुनियेत सुटीची मौज, मामाचे गाव हरवले !

कार्टूनच्या दुनियेत सुटीची मौज, मामाचे गाव हरवले !

Published On: Apr 24 2018 1:39AM | Last Updated: Apr 24 2018 1:28AMमंठा : प्रतिनिधी

उन्हाळी सुटी लागली की बच्चे कंपनीची मामाच्या गावाला जाण्यासाठी लागबग असायची. आई-बाबांकडे हट्ट पुरवून मामाकडे जाण्याचा बेत आखला जायचा. मात्र गत काही वर्षांत मामाचे गाव नावापुरतेच राहिले. आज रोजी कार्टून वाहिन्यांच्या दुनियेत बच्चे कंपनी मामाचे गाव विसरली आहे.

आपल्या पाल्यांकडून आज प्रत्येक आई वडिलांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की, आनंददायी शिक्षणाची संकल्पना केवळ कागदावरच उरली आहे. शिक्षण म्हणजे आनंददायी प्रवास राहिला नसून जीवघेणी स्पर्धा झाल्यामुळे मुलांच्या सुटीचे स्वरुपच बदलले आहे. पूर्वी सुटी म्हटले की, मामाचा गाव, मामीच्या हातचे जेवण, मनसोक्त रानोमाळ हिंडणे आणि बागडणे , झाडाला लगडलेल्या कैर्‍या, चिंचा खाणे ,पोहायला शिकणे अशी सगळी मौज असायची, परंतु आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या काळात मुलांचे भावविश्वच बदलून गेले आहे. झुक झुक झुक झुक आगीन गाडी , धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया...यासारखी बालगीते आता फक्त ऐकण्यापुरतीच उरली आहेत.

आज कार्टूनची अनेक चॅनेल्स उपलब्ध आहेत. विशेषतः वय वर्षे दहा ते 16 वर्षादरम्यानची मुले दिवसभर या कार्टून्स चॅनलसमोर हालत नाही. वेळप्रसंगी तहान भुकही विसरतात. यामुळे मामाचे गाव अथवा उन्हाळी शिबिरांना प्रतिसाद मिळत नाही. 

आज पालकांच्या अपेक्षा वाढल्यामुळे आणि दुसरीकडे जीवघेणी स्पर्धा असल्याने एका पाठोपाठ एक परीक्षा म्हणजे शिक्षण असे चित्र निर्माण झाले आहे. सुटीतही विविध परीक्षांची तयारी, शिकवणी वर्ग आणि कोर्सेसमुळे मुलांना सुटीचा उपभोगच घेता येत नाही अशी परिस्थिती आहे. पूर्वी समर व्हॅकेशन सारखे शब्द कधीच नव्हते. कधीकाळी सुटी म्हणजे अभ्यासाला पूर्णविराम असायचा. याकाळात  विद्यार्थी आपले छंद जोपासायचे.

Tags : cortoon, summer vacation, mama, holidays