Mon, Jul 06, 2020 13:31होमपेज › Jalna › निम्न दुधना पाणी प्रश्न पेटला; शेतकऱ्यांचा जलसमाधीचा इशारा

निम्न दुधना पाणी प्रश्न पेटला; शेतकऱ्यांचा जलसमाधीचा इशारा

Published On: May 08 2019 6:51PM | Last Updated: May 08 2019 6:51PM
परतूर (जालना) : प्रतिनिधी

परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोडण्यावरून परभणी जिल्हा व जालना जिल्हा हा वाद आता चांगलाच तापला आहे. निम्न दुधना प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने परभणी जिल्ह्यात पाणी सोडल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. निम्न दुधना प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने तसेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.

परतूर तालुक्यातील केदार वाकडी येथील निम्नदुधना प्रकल्पात केवळ ८१ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी शिल्लक आहे. यामुळे परतूर व मंठा तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे. तरीदेखील परभणी जिल्ह्यातील काही राजकीय पुढाऱ्यांनी दबावगट तयार करून या प्रकल्पातून तीन वेळेस पाणी सोडले असताना पुन्हा एकदा नदीपात्रात द्वारे पाणी सोडण्याचा अट्टाहास धरला आहे. याबाबत परतूर व मंठा तालुक्यातील शेतकरी व पुढारी गाफील राहिल्याचा नेमका फायदा घेत तब्बल तीन वेळा परतूर तालुक्यातील हक्काचे पाणी पळविण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीत युवा नेते राहुल लोणीकर यांना भाजपचे तिकीट मिळणार व परभणीमधून ते निवडणूक लढणार या आशेवर खुद्द पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संमतीने तालुक्यातील आरक्षित असलेला पाणीसाठा परभणी जिल्ह्यात सोडण्यात आला. यावेळी विरोधी पक्ष व सहकारी पक्ष हेही मूग गिळून गप्प होते. मात्र परतूर तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. सध्या 423 टँकरद्वारे तालुक्यातील गावात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याच धरणातून परतूर व मंठा शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेद्वारे नागरिकांना पाणी पुरविण्यात येते. हे सर्व पाहता निम्नदुधना धरणातील पाणी सोडण्यावरून वाद आता चांगलाच पेटला असून यामध्ये प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार असल्याचे यावरून दिसते.

यामुळे मंठा तालुक्यातील काही पुढाऱ्यांनी व धरणग्रस्त कृती समितीच्यावतीने परभणी जिल्ह्यात पाणी सोडल्यास आपण जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे नेते संदीप गोरे, सतीशराव निर्वळ, पंजाबराव बोराडे, रमेशराव चव्हाण, बंडू मानवतकर, परमेश्वर लाटे, आदी उपस्थित होते.