Fri, Jul 03, 2020 18:08होमपेज › Jalna › सिडकोला पाणी देण्यावरून पालिकेत राडा

सिडकोला पाणी देण्यावरून पालिकेत राडा

Published On: May 18 2018 1:16AM | Last Updated: May 17 2018 11:59PMजालना : प्रतिनिधी

शहरात नव्याने होऊ घातलेल्या सिडको प्रकल्पास पाणी देण्यास सर्वच नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. बुधवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सिडको पाणीप्रश्‍नासह विविध मुद्यावरून खडाजंगी होऊन पालिका प्रशासनास धारेवर धरण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्यधिकारी संतोष खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपालिकेची सर्वसाधारण सभेत सिडको प्रकल्पाला पाणी देण्याचा विषय विषयपत्रिकेत ठेवण्यात आला होता. त्यावर सर्वच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.
 आधी शहराची तहान भागवा, नंतरच सिडको प्रकल्पास पाणी देण्याचा विचार करा, असा आग्रह उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह सर्व नगरसेवकांनी लावून धरला.  

दरम्यान, 48 एमएलडी पाण्याचा उपसा जायकवाडी धरणातून होत आहे. त्यातील जालना शहरात 42 एमएलडी पाणी गरजेचे आहे. तर चार एमएलडी पाणी अंबड शहराला देण्यात येत आहे. त्यामुळे सिडकोला नगरपालिका पाणी देणार की नाही याचे उत्तर सभेत मिळाले नाही. पालिकेच्या मालकी असलेल्या अग्निशमक बीओटी तत्त्वावर शॉपिंग सेंटर बांधकाम करण्याबाबत नगरसेवक महावीर ढक्का यांनी आक्षेप घेत आज रोजी पालिकेकडे पाचपेक्षा अधिक व्यापारी संकुले आहेत.

 यातून पालिकेला किती उत्पन्न मिळते अथवा या दुकानाचा हिशेब काय असा मुद्दा उपस्थित करून शॉपिंग सेंटरला विरोध केला. भाजपचे गटनेते अशोक पांगारकर यांनी अग्निशमक दलाकडे असलेल्या गाड्यांचा मुद्दा उपस्थित केला. काही वषार्र्ंपासून लाखो रुपये खर्च करून नवीन अग्निशमक वाहने खरेदी केली होती. जुन्या व नवीन गाड्यांचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप करून सोलापूर येथे असलेल्या अग्निशमक दलाच्या गाडीचे काय झाले, यावर त्यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला.

 नगरसेवक ज्ञानेश्‍वर ढोबळे यांनी शहरांतर्गत टाकण्यात येणार्‍या जलवाहिनी व त्या कंत्राटदारास देण्यात येणार्‍या बिलाबाबत सभागृहात ठिय्या मांडून निषेध नोंदविला. ढोबळे  म्हणले की, शहरातील विविध भागांत जलवाहिनी टाकण्याचे काम बर्‍यापैकी पूर्ण झाले असले तरी जलकुंभाचे काम अपूर्ण आहे. तसेच नळजोडणी व इतर कामे बाकी असताना पालिका प्रशासन संबंधित कंत्राटदाराला बिले देत आहे.
 जलकुंभाचे व इतर काम पूर्ण झाल्याशिवाय कंत्राटदारास बिल अदा करण्यात येऊ नये.  विषय पत्रिकेवरील विषयांना यावेळी मान्यता देण्यात आली.