Thu, Jul 09, 2020 04:02होमपेज › Jalna › बोंडअळीचा निधी कागदोपत्री !

बोंडअळीचा निधी कागदोपत्री !

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 09 2018 1:02AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात खरीप हंगाम 2017 मध्ये बोेंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी कपाशीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर बाधित शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाच्या वतीने 73 कोटी 43  लाख रुपयांचे अनुदान शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले असून हा निधी प्रशासनास प्राप्‍त झाला. या निधीपैकी 73 कोटी 37 लाख 95 हजार 739 रुपयांचा निधी 3 जुलैपर्यंत वाटप करण्यात आला असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री करण्यात आला  आहे. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना अद्याप अनुदानाचे  पैसे मिळालेले नाहीत. या सर्व प्रकारात अनुदानाचे घोडे नेमके कोठे अडले हे कळण्यास तयार नाही.

जिल्ह्यात गतवर्षी लहरी हवामानामुळे शेतकर्‍यांचे  खरीप व रब्बी पिकांमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अनेक भागात जुलै महिन्यापर्यंत पाऊसच न पडल्याने तेथील पेरण्या खोळंबल्या होत्या. रब्बीमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर काही ठिकाणी गारपिटीने उभ्या मालाचे नुकसान झाले. त्यातच जोमात आलेल्या कपाशीच्या बोंडावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले कपाशीचे पीक हातातून गेले. बेांडअळीमुळे एकीकडे किडलेला व कवडी कापूस निघत असतानाच दुसरीकडे तो वेचण्यासाठीही शेतकर्‍यांना 8 ते 10 रुपये किलोची मजुरी द्यावी लागली. 

शेतकर्‍यांसाठी मागील वर्ष आर्थिक संकटाचे गेल्यानंतर या वर्षी पेरणीसाठी बँकाही पीक कर्ज देण्यास तयार नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला.त्यामुळे शासनाने बोंडअळीचे पैसे पेरणीपूर्वी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करणे अपेक्षित होते, मात्र केवळ कागदोपत्री 96. 47 टक्के रक्‍कम देण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती उलटी आहे.

सरकाने जिल्ह्यासाठी 73 कोटी 43 लाखांचे अनुदान जाहीर केले. या अनुदानासाठी पात्र लाभार्थी  शेतकर्‍यांचे आधार कार्ड, 7/12, बँक पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे प्रशासनाच्या वतीने तलाठ्यांच्या माध्यमातून घेण्यात आले होते.