Fri, Jul 03, 2020 19:42होमपेज › Jalna › शीर नसलेला मृतदेह आढळला

शीर नसलेला मृतदेह आढळला

Published On: Jun 11 2018 12:40AM | Last Updated: Jun 10 2018 11:54PMवडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसागाव शिवारातील जायकवाडीच्या डाव्या कालव्यात शीर नसलेला अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. हा मृतदेह विवस्त्र असून तो  18 ते 19 वर्ष वयोगटातील तरुणाचा असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

तरुणाचा डाव्या कालव्याजवळ अत्यंत निर्दयीपणे खून करून त्याचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले. घटनास्थळाजवळील जागा रक्‍ताने माखलेली असून तेथे सिगारेटचे थोटकेही पडलेले निदर्शनास आले. बाहेरून या तरुणास येथे आणून त्याचा खून केला गेला असावा असा अंदाज आहे. 

गोंदी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह डाव्या कालव्यातून वर काढला. केवळ धड असलेल्या या मृतदेहाने पोलिसांनाही चक्रावून टाकले आहे. मुंडके नसलेल्या या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.  घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली की  शीर नसलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे. याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. घटनास्थळी मृतदेह पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. मात्र डॉग स्कॉडच्या लिली नावाची कुत्री माग न काढताच परतली. घटनास्थळी परतूरचे पोलिस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांनी भेट दिली. यावेळी गोंदीचे पोलिस निरीक्षक अनिल परजणे,पोलिस उपनिरीक्षक अमन सिरसाट यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी भेट दिली. मुंडके नसलेला मृतदेह हा शवविच्छेदन करण्यासाठी अंबड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.