Fri, Jul 03, 2020 18:55होमपेज › Jalna › ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हाणामारी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हाणामारी

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMपरतूर : प्रतिनिधी 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरून भावकीमधील दोन गटांत तुंबळ हाणामारीची घटना उस्मानपूर येथे घडली. यात 11 जणांविरुद्ध परतूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद उफाळून आल्याने ही घटना घडली. ग्रामरोजगार सेवक मदन ओमप्रकाश राऊत यांनी सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी ग्रामसभा न घेता गावातील नागरिकांच्या बनावट सह्या केल्याचा प्रकार गावातील काही नागरिकांच्या लक्षात आणून दिला.

याबाबत ज्यांच्या बनावट सह्या आहेत, त्यांनी गटविकास अधिकारी परतूर यांच्याकडे ग्रामसभा न घेताच आपल्या प्रोसिडिंगवर आपल्या नावाच्या समोर बनावट सह्या केल्या असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. उस्मानपूरमधून 15 ते 20 जणांनी आपल्या बनावट सह्या केल्या असल्याच्या तक्रारी पंचायत समितीच्या बीडीओकडे केल्या होत्या. या सगळ्यांच्या मागे फिर्यादी ओमप्रकाश राऊत यांचा मुलगा मदन राऊत याचा हात असल्याचा संशय होता. 17 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास ओमप्रकाश राऊत घरी असताना शेजारील भावकीतील रामकिसन अर्जुन राऊत, अशोक अर्जुन राऊत, अर्जुन त्रिंबक राऊत, अमोल सुदाम राऊत, अनिल सुदाम राऊत आदींनी  फिर्यादीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी बाहेर येताच यातील काही जणांनी लाठ्याकाठ्यांचा मार सुरू केला. 

फिर्यादीचा मुलगा सोडविण्यास आला असता त्याच्या डोक्यावर काठी मारून जखमी केले. ओमप्रकाश राऊत यांच्या फिर्यादीवरून वरील 11 आरोपींविरुद्ध परतूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत.