Fri, Jul 03, 2020 19:01होमपेज › Jalna › भांडणे लावून सरकार पोळी भाजतेय 

भांडणे लावून सरकार पोळी भाजतेय 

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 05 2018 11:17PMजालना : प्रतिनिधी

साखर कारखानदार व शेतकर्‍यांत भांडणे लावून सरकार आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेतकरी व साखर कारखानदार दोघेही एकत्र येऊन सरकारच्या बोंकाडी बसू शकते, हे सरकारने लक्षात घ्यावे असा घणाघातही त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. 

खा. शेट्टी म्हणाले की, साखर कारखानदार व शेतकरी यांच्यात केवळ उसाच्या भावावरून भांडण आहे, मात्र साखर कारखाना जगला तर शेतकरी जगणार आहे. हे शेतकरी ओळखून आहेत. साखरेला चांगला भाव मिळाला तरच कारखानदारांना शेतकर्‍यांच्या उसाला चांगला भाव देता येईल. त्यामुळे शेतकरी व कारखानदार यांचे भांडण केवळ भावापुरतेच असल्याचे सरकारने लक्षात घ्यावे. शेतकरी सन्मान यात्रा 1 मेपासून सुरू करण्यात आली. यावेळी शेतकरी सर्वबाजूने अडचणीत आला असल्याचे दिसून आले. शेतीमालासह दुधाला भाव नाही. कर्ज माफीनंतरही बहुसंख्य शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झालेला नाही. दुष्काळ, बोंडअळी यामुळे हातात पैसा नसताना बँकाही दारात उभे करत नाही. त्यामुळे खासगी सावकाराकडून जादा व्याजाने शेतकर्‍यांवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती व उत्पादन खर्चावर शेतीमालाला हमीभाव या दोन विधेयक मांडण्यासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन सरकारने बोलवावे या मागणीसाठी 10 मे रोजी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 हजार शेतकर्‍यांच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह साईनाथ चिन्नदोरे यांची उपस्थिती होती.