Sun, Sep 27, 2020 03:42होमपेज › Jalna › शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:20AMजालना : प्रतिनिधी

मुंबई-नागपूर या प्रस्तावित समृध्दी महामार्गात जाणार्‍या जामवाडी येथील शेतजमिनीस कमी दर दिल्याचा आरोप करीत समृद्धी महामार्गातील बाधित शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाल्यावर हा प्रकार घडला. 

महामार्गास आमचा विरोध नसून जिल्हा प्रशासनाने ठरविलेला मोबदला आम्हास अमान्य आहे. मोबदला प्रतिचौरस मीटरने देण्यात यावा,  अशी मागणी करीत शेतकर्‍यांनी अंगावर रॉकेल ओतले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत शेतकर्‍यांना अटक केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी शेतकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. महामार्गासाठी संपादित जमिनीच्या दरात तफावत आहे. इतरांप्रमाणेच योग्य दर देणे शक्य नसेल, तर प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाची परवानगी समृद्धीबाधित शेतकर्‍यांनी बुधवारी (दि.24) जिल्हाधिकारी यांच्या निवेदनाद्वारे मागितली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्याने  शेतकर्‍यांनी हे पाऊल उचलले.

जामवाडी येथील जमिनीला एकरी 16 ते 18 लाख रुपयांचा दर तर लगतच्या जालना शहरातील गटातील जमिनीला 1950 रुपये प्रतिचौरस मीटरचा दर देण्यात येतो. इतक्या प्रचंड प्रमाणात दरात तफावत आहे. ही बाब सर्व अधिकार्‍यांच्या निदर्शनास शेतकर्‍यांनी आणून दिली, परंतु न्याय न मिळाल्याने प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

येत्या आठ दिवसांत दरातील तफावत दूर न झाल्यास पुन्हा आत्मदहन करण्याचा इशाराही शेतकर्‍यांनी दिला आहे. आत्मदहनात उल्हास वाढेकर, काशीनाथ क्षीरसागर, साहेबराव वाकुडे, मच्छिंद्र सरोदे, संजय वाढेकर, सुभाष वाढेकर, शिवाजी वाढेकर, श्यामराव सरोदे, प्रकाश वाढेकर, रावसाहेब सरोदे, नूर खान आदी शेतकर्‍यांचा समावेश होता.

शासनाने दरातील तफावत दूर करून जामवाडी येथील जमिनीला 1950 रुपये प्रतिचौरस मीटरचा दर देण्यात यावा.  येत्या आठ दिवसांत यावर निर्णय न झाल्यास पुन्हा आम्ही आत्मदहन करणार आहोत. याची जबाबदारीही शासनाची राहील.
 -उल्हास वाढेकर, शेतकरी

आमच्यावर अन्याय झाला अनेकांनी मान्य केले आहे, मात्र न्याय देण्यासाठी कुणीही अधिकारी समोर यायला तयार नाही. एकीकडे पारदर्शकतेच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे शेतकर्‍यांवर अन्याय करायचा, न्याय मिळत नसल्यानेच टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे.           

-संजय वाढेकर, शेतकरी, जामवाडी