Thu, Jul 09, 2020 03:42होमपेज › Jalna › शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात 594 कोटी जमा

शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात 594 कोटी जमा

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 05 2018 11:02PMजालना : प्रतिनिधी

पात्र थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी व चालू थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत 31 मेअखेर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जवळपास 594 कोटी जमा केले आहेत. दरम्यान, खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपासाठी बँकांना 1 हजार 468 कोटींचे उद्दिष्ट दिल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

 शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत 24 जुलै 2017 ते 22 सप्टेंबर 2017  याकालावधीत ऑनलाइन पद्धतीने थकबाकीदार शेतकर्‍यांचे अर्ज मागवले होते. त्यानुसार 31 मे 2018 अखेर जिल्ह्यातील 20 बँकांच्या एकूण 162 शाखांमार्फत 1 लाख 23 हजार 734 शेतकर्‍यांचे 593 कोटी 69 लाख 35 हजार इतक्या रकमेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केला आहे. यात दीड लाखाच्या आतील थकबाकीदार 94 हजार 584 शेतकर्‍यांची 550 कोटी 22 लाख रुपये थकबाकी संबंधित बँक खात्यात जमा केली. 28 हजार 825 नियमित परतफेड कर्जदार शेतकर्‍यांना 40 कोटी 74 लाख रक्कम प्रोत्साहन म्हणून त्यांच्या बचत खात्यावर जमा केली आहे.