Thu, Jul 09, 2020 03:09



होमपेज › Jalna › शेतकरीविरोधी धोरणामुळेच शासन बॅकफुटवर: अजित पवार

शेतकरीविरोधी धोरणामुळेच शासन बॅकफुटवर: अजित पवार

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 25 2018 1:02AM



जाफराबाद : प्रतिनिधी

भाजप सरकारने शेतकर्‍यांच्या भावनेशी खेळू नये. शेतकरीविरोधी धोरणामुळेच सरकार बॅकफुटवर असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.

राष्ट्रवादीच्या वतीने भाजप-शिवसेना सरकारविरुद्ध  जाफराबाद येथील जुन्या तहसीलसमोरील प्रांगणात हल्‍लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, आमदार राजेश टोपे, जयंत पाटील, चित्रा वाघ, माजी खासदार पुंडलिक हरी दानवे, राज्यसभेचे खासदार  माजीद मेनन, माजी आमदार चंद्रकांत दानवे, डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रदीप सोळुंके, जयधरराव गायकवाड, निसार देशमुख, राजेश चव्हाण, रामधन कळंबे, दत्तू पंडित, कपिल आकात आदी उपस्थित होते.

नोटाबंदी, फसवी कर्जमाफी, जीएसटी, शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण, शेतकरीविरोधी धोरण, शिक्षणाचे खाजगीकरण, आरक्षण, भीमा कोरेगाव प्रकरण, बोंडअळी, भाजपतील जबाबदार व्यक्‍तींचे बेताल वक्‍तव्य या सर्व विषयांवर अजितदादांनी सत्ताधार्‍यांचा खरपूस समाचार घेतला.  जाफराबाद व भोकरदन तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे शेवटच्या टिपरापर्यंत ऊस घेतल्या जाईल, असे जाहीर आश्‍वासन यावेळी अजित पवार व राजेश टोपे यांनी दिले. यावेळी आमदार राजेश टोपे यांनी आरक्षण, न्यायव्यवस्था, सामाजिक सलोखा टिकविणे यांसारख्या गंभीर विषयांकडे शासन पाठ फिरवत असून फक्‍त फसव्या घोषणा करण्यातच ते व्यस्त असल्याचे टोपे म्हणाले. यावेळी एकनाथ शेवत्रे, रवीराज जैस्वाल, इंद्रराज जैस्वाल, फारूख कुरेशी, कैलास दिवटे, राजू जाधव, साहेबराव लोखंडे, दिनकर अंभोरे, फैसल चाऊस, बाबूराव लहाने, ज्ञानेश्‍वर लोखंडे आदींची उपस्थिती होती.

देशाची वाटचाल अराजकतेकडे
अजित पवार म्हणाले की, खडकपूर्णा धरणातील पाण्याचे नियोजनदेखील शासनाने न केल्याने त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. सत्ताधारी जाती-धर्मात भांडणे लावत आहे. कोरेगाव-भीमा दंगल सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच घडली. कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश येत आहे. भाजपचेच आमदार, खासदार पक्षावर नाराज आहेत. आज देशाची वाटचाल अराजकतेकडे जात आहे. आणीबाणी लागण्याची अवस्था निर्माण झाली आहे की काय, अशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. बड्या उद्योगपतींना कर्जमाफी मिळाली. मात्र, शेतकर्‍यांचे पैसे कुठे गेले, असा सवाल पवार यांनी केला.  

मतदारसंघात हुकूमशाही
भाजप-सेनेच्या संसाराला साडेतीन वर्षेे झाली तरी त्यांच्या विकासाचा पाळणा हालत नाही, अशी परिस्थिती आहे. सरकारच्या दुटप्पी कारभारावर हल्लाबोल करत चंद्रकांत दानवे यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा चांगला समाचार घेतला. मतदारसंघात लोकशाही नसून केवळ हुकूमशाहीचाच वापर केल्या जात असल्याचे चंद्रकांत दानवे म्हणाले.