Thu, Jul 09, 2020 03:50होमपेज › Jalna › अरविंद देशपांडेंची 2 हजारांवर व्यंगचित्रे 

अरविंद देशपांडेंची 2 हजारांवर व्यंगचित्रे 

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 04 2018 11:41PMजालना ः प्रतिनिधी

शब्दावाचून कळले--- शब्दाच्या पलीकडचे या गाण्यातील ओळीप्रमाणे एका छोट्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मोठा संदेश देण्याची कला व्यंगचित्रकारांना अवगत आहे. जालना शहरातील अरविंद देशपांडे या व्यंगचित्रकारानेही आजपर्यंत राजकीय नेत्यांसह शेतकरी, स्त्रीभू्रण हत्या, स्त्री शिक्षण, एड्स आदी विषयांवर तब्बल दोन हजारांच्यावर विविध व्यंगचित्र रेखाटून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 

जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यंगचित्रकार अरविंद देशपांडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले की, अनेकदा शब्दांमधून न मांडता येणारे अनेक विषय व्यंगचित्रकार आपल्या रेषांच्या माध्यमातून सहजपणे व्यक्त करतो. राजकीय नेते हे व्यंगचित्रकारासाठी जवळचे असल्याने विविध व्यंगचित्राच्या माध्यमातून राजकीय नेत्यांवर रेषांचे  फटकारे ओढले जातात. राजकीय नेत्यांवरील व्यंगचित्रे नेहमीच खळबळ उडवितात. व्यंगचित्र ही एक दृश्यभाषा म्हणूनही ओळखली जाते. शब्दहीन व्यंगचित्रे आणि शब्दप्रधान व्यंगचित्रे या दोन प्रमुख भागात व्यंगचित्रांचा समावेश करता येऊ शकतो. भाषा ओलांडण्याची ताकद आणि मार्मिकता या माध्यमात आहे. व्यंगचित्र केवळ विनोद, टीका, थट्टा-मस्करी, टिंगलटवाळी करण्यासाठी वापरणे म्हणजे या माध्यमाचा दुरुपयोग केल्यासारखेच होय. व्यंगचित्रांतून काव्यात्म आशय, सार्वकालिक सत्य, दु:ख, यातना, वेदना समर्थपणे मांडता येऊ शकतात.व्यंगचित्र म्हणजे काय ? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. काही जण त्याला केवळ मनोरंजनाचं माध्यम समजतात. तथापि गांभीर्याने विचार केला तर व्यंगचित्र हा स्वतंत्र साहित्यप्रकार आहे, हे लक्षात येते. व्यंगचित्र ही कलाकृती म्हणून स्वयंपूर्ण असते. त्यात विनोद असतो, विसंगती असते, कल्पकता असते, अतिशयोक्ती असते. चित्रांच्या माध्यमातून मनोरंजन व मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न व्यंगचित्र करत असते.