Fri, Nov 27, 2020 11:52होमपेज › Jalna › भोकरदन : तीन सख्ख्या भावांच्या मृत्यूनंतर पळसखेडा पिंपळे गावात शोले स्टाईल आंदोलन

भोकरदन : तीन सख्ख्या भावांच्या मृत्यूनंतर पळसखेडा पिंपळे गावात शोले स्टाईल आंदोलन

Last Updated: Nov 20 2020 5:15PM
भोकरदन : पुढारी वृत्तसेवा 

भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे गावात ऐन सणासुदीला मन हेलावून टाकणारी घटना घडली. तीन सख्ख्या भावांचा गव्हाला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. यानंतर सगळीकडे संतप्त भावना उमटल्यानंतर शुक्रवारी दुपारी गावातीलच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पंकज पिंपळे व फुलंब्री येथील प्रहार संघटनेचे पदाधिकारी मंगेश साबळे यांनी चक्क पेट्रोलची भरलेले कॅन घेऊन पाण्याच्या टाकीवर गेले आणि मागण्या मान्य केल्या नाहीतर दुपारी चार वाजता पेट्रोल टाकून दोघेही आत्मदहन करू, असा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनाची पळापळ सुरू झाली. दुपारपासून पोलिस अधिकारी व तहसीलदार, मंडळाधिकरी व तलाठी घटनास्थळी हजर आहेत. 

दरम्यान, बुधवारी (ता.१८) रात्री पळसखेडा पिंपळे येथील ज्ञानेश्‍वर अप्पासाहेब जाधव (वय २६), रामेश्‍वर अप्पासाहेब जाधव (वय २६) व सुनील अप्पासाहेब जाधव (वय १८) हे तिघे भाऊ शेतातील गव्हाला रात्री नऊ वाजता पाणी देण्यासाठी गेले होते. ते विहिरीत पडले अन् तिघांचाही मृत्यू झाला. पहिल्या भावाला वाचविण्यास गेल्यानंतर दोघांचाही म्हणजेच तिघांचाही मृत्यू झाल्याच्या घटनेने पूर्ण तालुकाच हादरला होता.

वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या जाधव घरातील वारस एका क्षणात संपले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत तिघांचेही मृतदेह हलवायचे नाही, असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. यानंतर पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजूर येथे पाठविण्यात आले होते. यानंतर राज्यातील विविध भागांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या, अनेकांनी आंदोलन करून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे इशारे दिले होते.

शुक्रवारी ( ता.२० ) गावातीलच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पंकज पिंपळे व फुलंब्री येथील प्रहार संघटनेचे पदाधिकारी मंगेश साबळे यांनी, तिघा भावंडाच्या वृद्ध आई-वडिलांना प्रत्येकी तीस लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना दिवसा सलग वीज द्यावी, तिघा भावांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वीज कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी केल्या असून आज दुपारी चारवाजेपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही दोघेही पेट्रोल अंगावर टाकून आत्मदहन करू असा इशारा दिला आहे. 

त्यानंतर दोघेही गावातील पाण्याच्या टाकीवर चढले आणि तेथून ते मदत मिळालीच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा दिल्या. त्यांनी अचानक असे आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांची समजूत काढीत आहेत. मात्र ते दोघेही ऐकण्याच्या मनस्तिथीत नसल्याने पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यानंतर तहसीलदार व त्यांचे कर्मचारीदेखील गावात असून ते देखील प्रयत्न करीत आहेत.