Tue, Jun 15, 2021 13:24होमपेज › Jalna › बालारफिकचा एकतर्फी विजय

बालारफिकचा एकतर्फी विजय

Published On: Dec 23 2018 7:19PM | Last Updated: Dec 24 2018 1:48AM
जालना : एकनाथ नाईक    

62 व्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या 62 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या लढतीत गतसालच्या  ‘महाराष्ट्र केसरी’ अभिजित कटके याला 11 विरुद्ध 3 अशा गुण फरकांनी पराभवाचा धक्‍का देत बुलढाण्याच्या बालारफिक शेख याने ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची गदा खांद्यावर घेतली.

रविवारी सायंकाळी जालना मुक्‍कामी अभिजित कटके आणि बालारफिक शेख हे बलदंड शरीरयष्टी असणारे दोन मल्ल ‘महाराष्ट्र केसरी’च्या किताबासाठी भिडले.
‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी राज्यातील मल्‍लांनी शड्डू ठोकला होता. अंतिम फेरी गाठण्यात मात्र पुण्याचा कटके गादी विभागातून व बुलढाण्याचा शेख माती विभागातून प्रतिस्पर्ध्यांवर मात करून यशस्वी ठरले होते.

‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच प्रवेश करणार्‍या बालारफिक शेख याने कटके याला चांगलीच टक्‍कर दिली. सात वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या हस्ते अंतिम लढत लावण्यात आली. दुसर्‍या मिनिटाला अभिजितने बालारफिकचा उजवा पाय पकडून त्याला आखाड्याबाहेरफेकले. पंचांनी अभिजितना 1 गुण दिला. पुन्हा कुस्तीला खडाखडी सुरुवात झाली. दोन्ही मल्लांनी ताकद आजमावल्यानंतर गर्दन खेचाखेचीला सुरुवात झाली. दोघंही एकमेकांवर सरस ठरत होते. रफिक याने कटकेवर ताबा मिळवून दोन गुणांची कमाई केली. पुन्हा कुुस्तीला खडाखडी सुरुवात झाली. रफिकने कटकेला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. कुस्ती आखाड्याबाहेर गेल्याने रफिकला 1 गुणांची कमाई झाली. मध्यंतरापर्यंत 3-1 गुणांनी बालारफिक आघाडीवर राहिला.

मध्यंतरानंतर कुस्तीला खडाखडी सुरुवात झाली. रफिकने अभिजितवर पकड घेऊन पटला लावण्याचा प्रयत्न केला; पण त्यातून चपळाईने अभिजित निसटला. या झटापटीत बालाने 2 गुणांची कमाई केली. दोन्ही मल्लांच्या समर्थकांकडून प्रोत्साहन दिले जात होते. आक्रमक होऊन बालाने कटकेचा उजवा हात खाली खेचत पाठीवर जाऊन दोन गुण घेतले. अभिजितने आक्रमक होऊन बालारफिकला मैदानाबाहेर  खेचण्याचा प्रयत्न केला; पण ताकदीने सरस असणार्‍या बालारफिकने अभिजितचा तो डाव धुडकावला. अभिजितवर कब्जा घेऊन दोन गुण वसूल केले व गुणांचा धावफलक हालता ठेवला. अखेरचे काही क्षण बाकी होते. तेव्हा 11 विरुद्ध 3 गुणांनी बालारफिक ‘महाराष्ट्र केसरी’ गदेच्या विजयाच्या दिशेने घोडदौड करीत होता. तर, कटकेच्या देहबोलीवरून त्याने आपला पराभव मान्य केल्याचे दिसत होते. तर, बालारफिक हात उंचावून आनंदात होता. अखेर ‘महाराष्ट्र केसरी’ गदेवर बुलढाण्याच्या बालारफिक शेख याने आपले नाव कोरले. 

स्पर्धेचे आयोजक ना. अर्जुन खोतकर, विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते बालारफिकला चांदीची गदा आणि धनादेश देण्यात आला.

यावेळी मैदानात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, दिनेश गुंड, संघटनेचे उपाध्यक्ष सर्जेेराव शिंदे, दयानंद भक्‍त, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार सुरेश कुमार, शशिकांत खेडेकर, जेथलिया, माजी खासदार अशोकराव मोहोळ, माजी आमदार चंद्रकांत दानवे, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर, भास्कर आंबेकर, जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष दयानंद भक्‍त आदी उपस्थित होते..
--------------------------
बालारफिकने बुलढाण्याला दिली ‘महाराष्ट्र केसरी’ची पहिली गदा 
महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्याला बालारफिक शेख याने ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची गदा मिळूवन दिली आहे. गेली 43 वर्षे बुलढाणा जिल्हा या गदेसाठी आसुसलेला होता. 
---------------------------
कुस्तीपंढरी कोल्हापुरातील सराव फळास आला
गेल्या अनेक वर्षांपासून बालारफिक शेखचे कुस्तीपंढारी कोल्हापूरशी अतुट नाते आहे. न्यू मोतिबाग तालमीत तो स्वर्गीय हिंद केसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गादर्शनाखाली सराव करीत होता. कुस्तीपंढरीतील सराव फळास आला. गरिबीवर मात करून व लाल मातीतून खेळून ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब मिळविला. त्यामुळे आज मी धन्य झालो, असे सांगत बालाचे वडील आदम शेख व आई बीना शेख यांनी आनंदाश्रू  ढाळले. 
--------------------------------
 13 डिसेंबर रोजी बालाने गाजविले होते वारणेचे मैदान
बालारफिक शेख याने 13 डिसेंबर रोजी वारणा (ता. पन्हाळा) येथील कुस्ती मैदान गाजविले होते. वारणा ट्रॅकर व वाहतूक किताबही त्याने पटकविला होता. आज त्याने जालना येथील आझाद मैदानात महाराष्ट्र केसरी किताब पटकावून उपस्थितांची वाहवा मिळविली. 
--------------------------------
बालारफिक 12 वीला तर कटके बी.ए.च्या प्रथम वर्षात 
बाला व कटके हे दोन्ही मल्ल कुस्तीबरोबर शिक्षणातही धडे गिरवत आहेत. रफिक 12 वीमध्ये तर कटके बी.ए. भाग 1 च्या वर्गात शिकत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर या दोघांनी कुस्तीची गुणवत्तादेखील चांगलीच जोपासली असून, नवोदित मल्लांना ही प्रेरणाच ठरू शकेल. 
------------------------------------
गणपतराव आंदळकर यांच्या विजयाच्या घोषणा 
 बालारफिक शेख याने किताब पटकविल्यानंतर शेखच्या चाहत्यांनी आनंदाश्रू ढाळत ‘स्वार्गीय गणपतराव आंदळकर यांचा विजय असो...,’ अशा जय घोष मैदानात घुमला. कुस्तीपंढरीतील न्यू मोतिबाग येथील तालमीत बालाने कुस्तीचे धडे गिरविले आहेत. एका बाजूला विजयाचा आनंद आणि दुसर्‍या बाजूला वस्ताद आंदळकर आपल्यात नाहीत याची उणीव मल्लांना जाणवली. त्यामुळे मैदानात मल्ल अश्रू ढाळत होते. 
-------------------------------------------------