बदनापूर : प्रतिनिधी
राजेवाडी (ता. बदनापूर) येथील युवक पवन देवबंद बम्हणावत (वय २२) याचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तब्बल चोविस तासांनी मिळाला असून याबाबत बदनापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेवाडी येथील युवक पवन पोहण्यासाठी गेला होता. विहरीत पोहताना दम लागल्याने तो बुडाला. ही घटना १ डिसेंबर रोजी दुपारी शेलगाव शिवारातील कचरुसिंग सुलाने यांच्या शेतातील विहरीवर घडली.
ही घटना गावातील नातेवाईकांना कळाल्यानंतर याची माहिती पोलिस विभाग आणि अग्नीशमन विभागाला देण्यात आली. बुडालेल्या पवनचा शोध घेण्यात आला. मात्र, विहीरीत पाणी जास्त असल्याने त्याचा मृतदेह मिळून आला नाही. यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोचून पंचनामा करत पवनचा शोध घेण्याचा अथक प्रयत्न केला. पण त्यांनाही त्यात यश आले नाही.
विहीरीत पाणी जास्त असल्यानेच मृतदेह मिळत नाही हे पाहून विहरीवर पाच मोटर बसवून पाणी उपसा करण्यात आला. त्यानंतर तब्बल चोविस तासानतंर पवनचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शेलगाव येथील सरकारी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास पो हे. कॉ. वनारसे करत आहेत.