Mon, Jul 06, 2020 14:09होमपेज › Jalna › दोन मुलांची माता प्रियकरासोबत पसार

दोन मुलांची माता प्रियकरासोबत पसार

Published On: Mar 11 2018 1:29AM | Last Updated: Mar 11 2018 1:25AMटेंभुर्णी : प्रतिनिधी

दोन मुलांना वार्‍यावर सोडून सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथून प्रियकरासोबत पळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर 37 वर्षीय महिलेचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र याची कुणकुण लागताच ते पसार झाले. सातारा पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. 

भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील एक पुरुष मिस्त्री कामासाठी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात कामासाठी गेला होता. त्यावेळी सातारा तालुक्यातील जवळे गावात काम करीत असताना 37 वर्षीय महिलेशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. त्या महिलेला दोन मुले असून एक आठवीत तर दुसरा सहावीत आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या या महिलेने आपली दोन्ही मुले सोडून प्रियकरासोबत पलायन केले. महिला हरवल्याची तक्रार खंडाळा पोलिसात तिच्या पतीने दाखल केली. आई हरवली असल्याने दोन्ही मुले आजारी पडली. तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. पोलिसांच्या मदतीने तपास सुरू असताना त्यांचे लोकेशन जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे मिळाले.

खंडाळा पोलिस ठाण्याचे जी.एस.भोईटे व तुषार कुंभार हे तिच्या नातेवाईकांसह टेंभुर्णीत दाखल झाले. त्यांना येण्यासाठी रात्र झाली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्या दोघांसाठी शोधमोहीम सुरू केली. याकामी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी त्यांना मदत केली. रात्रीच त्यांनी प्रत्येक वस्तीवर त्या महिलेचे आणि पुरुषांचे फोटो दाखवून ही जोडपे कुठ आलय का याचा शोध घेतला, परंतु दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले.

महिलेच्या लग्नाला 20 वर्षे, मुले पडली आजारी

त्या महिलेच्या लग्नाला वीस वर्षे झाली. संसार सुरळीत सुरू असताना महिला दोन मुलांना सोडून पळाली. तिचे मुले आजारी पडले असल्याचे पोलिस कर्मचारी भोईटे यांनी सांगितले. एकवेळ मुलांना भेटून त्या महिलेने जेथे जायचे तेथे जावे असे तिच्या नातेवाईकांसह पतीचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले. 

महिनाभर टेंभुर्णीत वास्तव्य 

दोन मुलांना सोडून आलेल्या महिलेने आपल्या प्रियकरासोबत महिनाभर येथे वास्तव्य केले. ते एका ठिकाणी ते भाड्याने राहत होते. पोलिस शोधण्यासाठी आले. त्या रात्रीही ते त्या भाड्याच्या खोलीतच होते. परंतु लोकेशन गावचे असल्याने त्यांचा निश्‍चित ठावठिकाणा सापडला नाही. दुसर्‍या दिवशी ते रुग्णालयात उपचारासाठी गेले ते परत आलेच नाही. त्यांचे साहित्यही त्या खोलीत पडून आहे, असे सांगण्यात आले.