Thu, Jul 09, 2020 03:49होमपेज › Jalna › तीन तालुक्यांमध्ये भीषण पाणीटंचाई

तीन तालुक्यांमध्ये भीषण पाणीटंचाई

Published On: Mar 07 2018 2:11AM | Last Updated: Mar 07 2018 2:10AM जालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या तोंडावरच भोकरदन, जाफराबाद व परतूर या तीन तालुक्यांत पाणीटंचाईची दाहकता जाणवू लागली आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी 14 विहिरी अधिग्रहीत केल्या असून 18 टँकरद्वारे 15 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने मार्चपर्यत 22 कोटी 48 लाख 4 हजार रुपयांचा  टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. जाफराबाद तालुक्यात पाणीटंचाईची दाहकता जास्त असून या तालुक्यातील 8 गावांना 9 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. भोकरदन तालुक्यातील 8 गावांना तर परतूर तालुक्यातील एका गावास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

वाढत्या उन्हासोबत नागरिकांना पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहे. जिल्ह्यातील 101 गावांचे टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. या वर्षी भोकरदन व जाफराबाद तालुक्यात परतीचा पाऊस न झाल्याने या दोन तालुक्यात पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. जाफराबाद जवळील खडकपूर्णा धरणात केवळ 26 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्‍लक असून तालुक्यातील तीन लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी पाणीटंचाई आराखड्यात घट झाली आहे. गतवर्षी 48 कोटी 2 लाख 98 हजारांचा टंचाई आराखडा जानेवारी ते मार्च या महिन्यासाठी तयार करण्यात आला होता. 

यावर्षी त्यात घट झाली असून हा आराखडा 22 कोटी 48 लाख 4 हजारांपयर्र्ंत कमी झाला आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर बनू शकते हे लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच पाऊले उचलणे गरजेचे आहे. जाफराबाद व भोकरदन  तालुक्यातील ग्रामीण भागांना टंचाईची दाहकता अधिक आहे. महिला व मुलींना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात शासकीय टँकर सुरू असून अद्याप एकही खासगी टँकर सुरू करण्यात आले नाही.