Mon, Jul 06, 2020 14:34होमपेज › Jalna › पाणी पातळीत झपाट्याने घट;पाणीटंचाईची दाहकता वाढली

पाणी पातळीत झपाट्याने घट;पाणीटंचाईची दाहकता वाढली

Published On: Nov 16 2018 1:27AM | Last Updated: Nov 16 2018 1:27AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून 45 टँकरद्वारे 25 गावे व 7 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचा उपसा वाढल्याने तब्बल 2 मीटरने पाणी पातळीत घट झाली आहे. नागरिकांची तहान भागविण्यासाठी तब्बल 67 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील  आठ तालुक्यात केवळ 61.51 टक्के पाऊस पडल्याने टंचाईची दाहकता वाढली आहे.पाण्याचा उपसा मोठया प्रमाणावर होत असल्याने पाणी पातळीत झपाटयाने घट होत आहे. 7 लघु व 57 मध्यम प्रकल्पापैकी 27 प्रकल्प कोरडे पडल्याने पाणी समस्या गंभीर बनली आहे. 35 हजार  लोकसंख्येच्या भोकरदन शहराची तहान भागविण्यासाठी 10 टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. तालुक्यात 8 शासकिय व 11 खासगी जाफराबाद तालुक्यात 8 शासकिय व 6 खासगी अशा एकुण 14 , परतुर 1 शासकिय, अंबड  1 खासगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी 67 विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

शेतकर्‍यांच्या मोटारी जप्त

पाणी टंचाईची दाहकता लक्षात घेउन प्रशासनाने लघु व मध्यम तलाव परिसरातील पाणी उपसा बंद करण्यासाठी विद्युत मोटारीचा विज पुरवठा खंडीत केला आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी जप्‍त करण्यात आल्या आहेत.भुजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षण विहीरींच्या तपासणीत पाणी पातळी तब्बल 2 मीटरने खोल गेल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.

साठा चार महिन्यांचा

शहरावर सध्या पाणी टंचाईचे संकट  घाेंंगावत आहे. नवीन जालन्यासाठी घाणेवाडी तर जुना जालन्यासाठी जायकवाडी येथून पाणी पुरवठा करण्यात येतो. घाणेवाडी तलावात केवळ पाच फूट पाणी असून हे पाणी 3 ते 4 महिने पुरेल एवढेच आहे.त्यामुळे भविष्यात नवीन व जुना जालना भागातील नागरिकांना  जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. मार्च महिन्यापासून शहरवासीयांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. जूनपर्यंत कसे होणार या विचाराने नागरीक हैराण झाले आहेत.