Thu, Jul 09, 2020 03:26होमपेज › Jalna › उपाहारगृहांमध्ये अशुद्ध पाणी 

उपाहारगृहांमध्ये अशुद्ध पाणी 

Published On: Aug 03 2018 1:34AM | Last Updated: Aug 03 2018 1:34AMजालना ः प्रतिनिधी

बहुसंख्य हॉटेल, धाबा, खानावळ व टपरी व्यावसायिक पिण्याच्या पाण्याबाबत कोणतीही काळजी घेत नसल्यामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वर्षातून एकदा परवाना नूतनीकरणापुरतेच शुध्द पाणी प्रयोगशाळेकडे पाठवून हॉटेल व्यवसायिक प्रशासन व नागरिकांच्या डोळ्यांत धूळ फेकून अशुध्द पाण्याचा वर्षभर सर्रास वापर करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यात जवळपास आठशेच्यावर हॉटेल, धाबे  परवानधारक आहेत, मात्र परवाना न घेता व्यवसाय करणार्‍यांची  संख्या दीड ते दोन हजारात आहेत. 

चौकाचौकात हॉटेल व चहाच्या टपर्‍या दिसून येतात. हे व्यावसायिक ग्राहकांना बोअर, विहीर अथवा नळाचे पाणी पाण्याच्या टाक्या अथवा रांजणात साठवून पिण्यासाठी देतात. या टाक्या व रांजण अनेक दिवस धुण्यात येत नसल्याने काही वेळा उंदीर व  पाली जीव या पाण्याच्या टाक्यातून विहार करताना दिसतात. हॉटेलमध्ये वापरल्या जाणार्‍या दूषित पाण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. 

पाणीपुरीसाठीच्या पाण्याचे काय? गुटखा, तंबाखू  चोळणार्‍या हातानेच खा !

हॉटेलसोबतच रस्त्यावरील पाणी पुरीसाठी वापरले जाणारे पाणी हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. चमचमीत खाण्याची सवय असलेले अनेक पुरुष, महिला, युवक व युवती यांच्यामुळे पाणी पुरीचालकांचा व्यवसाय चांगलाच बहरला आहे. पाणी पुरी विकणार्‍यांची कोणतीही नोंदणी होत नसल्याने पाणीपुरीच्या पाण्याबाबत न बोललेले बरे.पाणीपुरी विक्रेते पाणी पुरी विकताना गुटखा, तंबाखू हातावर चोळून तोच हात पाणी पुरीसाठी असलेल्या मडक्यात घालून ग्राहकांना पुरीत पाणी देताना पाहवयास मिळतात, मात्र त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. पाणी पुरीच्या पाण्याबाबत तपासणीची गरज आहे.