Thu, Jul 09, 2020 05:05होमपेज › Jalna › जिद्द बाळगून २ एकरात सव्वाचार लाखांचे उत्पन्‍न

जिद्द बाळगून २ एकरात सव्वाचार लाखांचे उत्पन्‍न

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:06AMतीर्थपुरी : प्रतिनिधी 

घनसावंगी तालुक्यातील उढाण कंडारी येथील तरुण शेतकरी राजाराम उढाण यांनी पारंपारिक शेतीपद्धतीला फाटा देत फळशेतीवर भर दिला. जिद्द उराशी बाळगून बाहेरगावाहून द्राक्षांची रोपे आणून लागवड केली. दोन वर्षांत यातून 4 लाख 20 हजार रुपयांचे उत्पन्‍न काढले आहे.

तीर्थपुरीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उढाण कंडारी आणि परिसरातील शेतकरी पारंपरिक शेती करतात; परंतु सुशिक्षित असलेल्या राजाराम उढाण या तरुण शेतकर्‍याने शेतीत काही तरी वेगळे करून दाखवायचे हे ध्येय उराशी बांधले. वडिलोपार्जित असलेल्या वीस एकर शेत जमिनीपैकी दोन एकरांत दोन हजार द्राक्षांची झाडे लावली. यात नैसर्गिक पद्धतीने वापर केला.  यासाठी तासगाव येथून द्राक्षांच्या वेगवेगळ्या जातींची रोपे आणून लागवड केली. 5 एप्रिल 2017 रोजी द्राक्षांची बाग धरली. यातून  पहिल्या वर्षी 14 टन माल काढण्यात आला. 

30 रुपये प्रतिकिलो या दराने व्यापार्‍यास माल विक्री करून चार लाख वीस हजार रुपयांचे उत्पन्‍न मिळवले आहे. या लागवडीसाठी सात लाख रुपये खर्च आला असून  दुसर्‍या हंगामात तीस ते पस्तीस टन माल अपेक्षित असून यातून दहा ते बारा लाख रुपये उत्पन्‍न मिळेल, असे राजाराम उढाण यांनी सांगितले.