Thu, Jul 09, 2020 05:17होमपेज › Jalna › गारपीटमुळे शेतकर्‍यांचे नुकसान, सव्वापाच कोटी अपेक्षित निधी

गारपीटमुळे शेतकर्‍यांचे नुकसान, सव्वापाच कोटी अपेक्षित निधी

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 27 2018 2:00AMजालना : प्रतिनिधी

गेल्या पंधरवड्यात झालेल्या गारपीटमुळे तालुक्यातील शेतकरी बाधित झाले असले तरी बागायती व जिरायती शेतीसह फळपिकांनाही फटका बसला आहे. यात सहा हजार 762 शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून यासाठी 5 कोटी 20 लाख 64 हजार 896 रुपयांची अपेक्षित निधीची गरज आहे.

अचानक ओढवलेल्या संकटाने फळपिकांसह भाजीपाला व बागायती शेतीची कोट्यवधीची हानी केली. तालुक्यात बाधित शेतकर्‍यांची संख्या 6 हजार 762 एवढी आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले बाधित क्षेत्र हे. 4 हजार 255.15 हेक्टर आहे. यासाठी जालना तालुक्यासाठी  अपेक्षित निधी 5 कोटी 20 लाख 64 हजार 896 रुपये अपेक्षित असल्याचे तहसील कार्यालयाच्या विश्‍वासनीय सूत्रांंनी सांगितले आहे. 

पंधरवड्यात झालेल्या गारपीटमुळे जालना तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात गहू, हरभरा, ज्वारी अन्य पिकांसह द्राक्ष, डाळिंब, मोसंबी या फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सर्वाधिक फटका हा जिरायत क्षेत्राला बसला असून 1610.27 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बागायत 1442.84 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच फळपिकांचे 1202.04 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

यात सर्वाधिक फटका द्राक्षाच्या बागेला बसला आहे. यात जवळपास 6 हजार 762 शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीच्या निधीबाबत शेतकरी संशयित आहेत. कर्जमाफी, बोंडअळीनंतर आता गारपिटीच्या नुकसानीचे गाजर दाखविण्यात आल्याने शेतकरी  नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. शासन प्रत्यक्षात मदत कधी करणार हा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे.