धक्‍कादायक! महिलेवर चाकूने गळ्यावर, तोंडावर वार करत फेकले कालव्यात 

Last Updated: Jan 14 2021 8:36AM
वडीगोद्री (जालना) : पुढारी वृत्‍तसेवा 

एका महिलेला चाकूने वार करून वडीगोद्री येथील औरंगाबाद - सोलापूर महामार्गावरील पुलाजवळ डाव्या कालव्यात फेकून दिल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र त्या महिलेने स्वतःचा जीव वाचवत ती डाव्या कालव्याच्या पाण्यातून बाहेर आली. ही घटना काल (बुधवार) रात्री १०:३० वाजण्याच्या दरम्यान घडली.

अधिक वाचा : ‘WhatsApp’च्या पॉलिसीमुळे ‘टेलिग्राम’ची चांदी!

या विषयी अधिक माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथील सुशिला विश्वास राठोड या महिलेला वडीगोद्री येथील डाव्या कालव्यात टाकले. मात्र तिने कसे बसे डाव्या कालव्यातून वर येत आपला जीव वाचवला. एक महिला जखमी अवस्थेत कालव्यातून बाहेर आल्याची माहिती नागरिकांना कळताच नागरीकांनी घटनास्थळी जाऊन तिला वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील जावळे यांनी संबंधीत महिलेवर प्राथमिक उपचार केले.

अधिक वाचा : फक्त ५ महिन्यांत तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली! 

सदर महिलेच्या गळ्याला, कमरेला, तोंडावर व पाठीवर चाकूचे वार असल्‍याचे समोर आले. ती गंभीररीत्या जखमी झाली होती. यावेळी तिला विचारले असता तिने सांगितले, की मी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथील असून, सुशिला विश्वास राठोड असे माझे नाव आहे. लिलाबाई अंकुश राठोड, अंकुश राठोड यांच्याकडे माझे पैसे होते. ते पैसे देतो म्हणाले म्हणून मी आले होते. मात्र लिलाबाई अंकूश राठोड, अंकूश राठोड व त्यांचा मुलगा रवी राठोड यांनी मला मारहाण करून माझ्याकडून मोबाईल, सोने व पैसे काढून घेत मला पोत्यात भरून पाण्यात आणून टाकल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 

अधिक वाचा : भारतीय लष्करातील मेजरने साकारले जगातले पहिले युनिव्हर्सल बुलेटप्रूफ जॅकेट

या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन सदर महिलेला औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले. सदर घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे करत आहे.