Mon, Jul 06, 2020 15:52होमपेज › Jalna › अवैध वाळू तस्करीने घेतला तरुणाचा बळी

अवैध वाळू तस्करीने घेतला तरुणाचा बळी

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 27 2018 11:59PMवडीगोद्री : प्रतिनिधी 

अवैध वाळू तस्करी करताना महसूलचे पथक आल्याचे लोकेशन मिळताच कारवाईच्या धाकाने लाईट बंद करून सुसाट वेगाने पळणार्‍या टॅक्टरने रस्त्यावरून चालणार्‍या तरुणाला चिरडून टॅक्टरसह चालक पळून गेला. ही  घटना गुरुवारी (दि.26) रात्री 12 वाजेच्या दरम्यान शहागड (ता.अंबड) येथे घडली. वसीम माणिक शेख (वय 25 रा. शहागड) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

गुरुवारी रात्री शहागडच्या गोदावरी नदी पात्रात आठ दहा टॅक्टर अवैध वाळू भरत असताना रात्री साडे अकरा दरम्यान महसूलचे पथक शहागडच्या दिशेने येत असल्याचे लोकेशन तस्करांना लागल्यानंतर आपल्यावरील कारवाईच्या भीतीने मिळेल त्या रस्त्याने अवैध वाळू तस्कर टॅक्टरचे लाईट बंद करून सुसाट टॅक्टर पळवत होते. शहागड मुख्य चौक असलेल्या रस्त्यावरून मिस्त्री काम करणारा वसीम माणिक शेख जात असतांना विना क्रमाकाच्या टॅक्टर ने वसीमला जोराची धडक दिली.

यामध्ये वसीम गंभीर जखमी झाल्याने शिवसेना शहरप्रमुख इम्तियाज मनियार, टिपू सुलतान अंबड तालुकाध्यक्ष सिराज काझी, एकबाल पिंजारी, समीर बागवान, यांनी जखमी वसीमला प्रथम शहागडातील खासगी रुग्णालयात, त्यानंतर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.