होमपेज › Jalna › पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 12 2018 11:23PMवाकडी : प्रतिनिधी

भोकरदन तालुक्यातील वाकडी परिसरात पाऊस व वातावरणातील बदलांमुळे विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. कृषी विभागाने कोणत्या रोगांवर शेतकर्‍यांनी कसा प्रतिबंध करावा, कोणत्या औषधांची फवारणी करावी, याचे पत्रकही प्रसिद्ध न केल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होत आहे. 

यावर्षी जून महिन्याच्या शेवटी पावसाने दमदार सुरुवात केली. शेतकर्‍यांना दुबार पेरणी करण्याचे काम पडले नाही. पिके जोमदार आहेत. मात्र, रिमझिम पाऊस व वातावरणातील बदलांमुळे मका, सोयाबीन, कपाशी व इतर पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव आहे. मका पिकाची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे. पोंग्यात अळी पडल्याने पिके पिवळे पडली आहेत.

कपाशीवरही अळींचा प्रादुर्भाव आहे. असे असताना शेतकरी कोणत्या रोगावर कोणते कीटकनाशक, पावडर, गोळ्यांचा उपयोग करावा, या चिंतेत आहेत. कृषी विभाग मात्र कार्यालयातून तालुक्याचा कारभार पाहत आहे. या विभागाचे अधिकारी दौरे करीत नाहीत. पिकांची पाहणी करीत नाही. वृत्तपत्रात एखाद्या विभागाची बातमी झळकली की, त्या शिवारात भेट देऊन फोटोसेशन करण्यात कृषी विभाग सध्या व्यस्त आहे. या विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या शिवारात जाऊन त्यांच्याशी चर्चा करून विविध पिकांची पाहणी करावी, मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक किंवा तालुका कृषी अधिकार्‍यांनी प्रसिद्धिपत्रक काढून कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कायम उपाययोजना करावी, यासाठी पुढाकार घेतला नाही. पिकांवर रोगांचा प्रमाण पाहता कृषी विभागाने शेतकर्‍यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.